esakal | विदर्भातील विद्यार्थ्यांना बसणार परीक्षेची झळ, कडक उन्हाळ्यात दहावी बारावीच्या परीक्षा

बोलून बातमी शोधा

student will face problem for exam held in summer}

मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहुल लागत असते. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढतो. विदर्भात राज्याच्या तुलनेत उन्हाचा पारा ४८ पर्यंत जातो. याउलट पुण्या-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण यापेक्षा थंड आहे.

विदर्भातील विद्यार्थ्यांना बसणार परीक्षेची झळ, कडक उन्हाळ्यात दहावी बारावीच्या परीक्षा
sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, विदर्भात एप्रिल ते मेदरम्यान कडक उन्हाळा असल्याने या काळात परीक्षा घेतल्याने येथील विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. विशेष म्हणजे, बोर्डाकडून देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रांवर सोयी-सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना उकाड्याचाही सामना करावा लागणार आहे. 

हेही वाचा - कुठे गेली प्लास्टिक बंदी? प्रशासन करतंय कानाडोळा; ग्राहक-विक्रेत्यांकडून सर्रास वापर 

मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहुल लागत असते. त्यानंतर एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढतो. विदर्भात राज्याच्या तुलनेत उन्हाचा पारा ४८ पर्यंत जातो. याउलट पुण्या-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण यापेक्षा थंड आहे. दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्चदरम्यान होत असते. तसेच १ ते २५ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. यानंतर पेपर घेता न आल्याने त्याचे गुण इतर पेपरच्या मूल्यांकनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना देण्यात आले. हा अनुभव बघता, यावर्षी २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान बारावी तर २९ एप्रिल ते २० मेदरम्यान दहावीचे पेपर घेण्यात येणार आहे. दरवर्षी विदर्भात नागपूर आणि अमरावती या दोन विभागातून दहावीच्या परीक्षेत पावणेचार लाख तर बारावीमध्ये सव्वातीन लाखावर विद्यार्थ्यांचा समावेश होत असतो. याही वर्षी जवळपास तेवढेच विद्यार्थी परीक्षा देतील यासाठी ९०० पेक्षा अधिक परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, यातील काही परीक्षा केंद्र वगळता, बाकीच्या केंद्रांवर फॅन आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी पेपर सोडवायचा कसा असा प्रश्न निर्माण होणार आहे. 

हेही वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता...
 
यंदाही उन्हाळा तापणार -
हवामान विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भात कडक उन्हाचे संकेत दिले आहेत. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा जबर तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास नागपुरात २३ मे २०१३ रोजी कमाल तापमानाने ४७.९ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला होता. गतवर्षीही पारा ४७.५ वर गेला होता. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे २२ मे २०१३ रोजी ४८.२ इतकी करण्यात आली होती. आतापर्यंतचे ऊन लक्षात घेता यावेळचा उन्हाळाही वैदर्भींना घाम फोडण्याची दाट शक्यता आहे.

बारावी - मार्च २०२० 

  • नागपूर विभाग - १,५६,८७७ (नियमित), १०,७८७ - (फेरपरीक्षार्थी) 
  • अमरावती विभाग - १,४२,७२५ (नियमित), ८,१६४ (फेरपरीक्षार्थी) 

दहावी - मार्च २०२० 

  • नागपूर विभाग - १,६१,३८८(नियमित), २१,९३२ (फेरपरीक्षार्थी) 
  • अमरावती विभाग - १,६७,४५५ (नियमित), १९,३९४ (फेरपरीक्षार्थी)