यशोगाथा! एकेकाळी करत होता मिळेल ते काम; स्वप्नांसाठी गाठली मायानगरी अन् बनला दिग्दर्शक 

Trushant Ingale.jpg
Trushant Ingale.jpg

नागपूर: सिनेमाचे तिकिटे ब्लॅक मध्ये विकणारा मुलगा, रिक्षा चालकाचा मुलगा, अनाथ मुलगा मोठा झाल्यावर मोठा अधिकारी किंवा धनवान व्यक्ती बनल्याचे आपण चित्रपटातून पाहतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मधून यशो शिखर गाठणाऱ्याचे असे काही कथानक आपण आजवर अनेक चित्रपटांच्या माध्यमातून पाहिले आहे. मात्र, नागपुरात मिळेल ते काम करणाऱ्या एका तरुणाने ही कथा सत्यात उतरविली आहे. तृशांत इंगळे असे या तरुणाचे नाव असून त्याने आज मायानगरी गाठत चित्रपट दिग्दर्शीत केला आहे.

वडील लहान असतानाच सोडून गेले. त्यामुळे, दोन बहिणी आणि तृशांतची जबाबदारी आईवरच आली. आई फुलवंती इंगळेने भाजी, केटरिंग व्यवसायात कामे करून घराला हातभार लावला. पुढे जागरूक नागरिक मुरलीधर चव्हाण (मानलेले काका) यांनी या मुलांची जवाबदारी उचलली आणि तृशांतला प्रोत्साहन दिले. 

तृशांतनेही आईला मदत म्हणून कधी भाजीच्या दुकानात, कधी पतंग विकून, कधी ब्रेड-पाव विकून तर कधी एटीएमची साफ-सफाई करत बाल कामगाराचा ठप्पा स्वत:वर लावून घेतला. त्याच्या घराजवळ राहणारे त्याचे मित्र बहुजन रंगभूमीच्या बाल नाट्यामध्ये काम करण्यासाठी यायचे.

एकेदिवशी त्यांच्या सोबत आलेला तृशांत तेथेच रमला आणि रंगभूमीला आपले मन अर्पण करून बसला. नाट्य संस्काराचे धडे घेत बाल नाट्यात त्याने भूमिका केल्या. राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत रौप्य पदकासह अन्य अनेक पारितोषिक पटकाविले आहेत. कालांतराने लेखन-दिग्दर्शनाचे धडे घेत दोन अंकी नाटक, एकांकिका, पथनाट्य, बाल नाट्यातून तृशांत इंगळेचा नाट्य क्षेत्रातील प्रवास अविरतपणे सुरुच होता. हीच जिद्द ठेऊन त्याने मुंबई गाठली आणि चित्रपट, मालिका, जाहिराती, प्रॉडक्शन वर्कमध्ये सर्वस्व झोकून देत काम केले. त्याने नुकताच कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या ‘झाडीपट्टी रंगभूमी’वर आधारित झॉलीवूड नावाचा सिनेमा बनवला. 

रंगभूमीला विसरला नाही

तृशांत हा एक गरीब कुटुंबातील पण असामान्य उर्जेतून आपली विलक्षण प्रतिभा सिद्ध करणारा मुलगा आहे. त्याचा आजवरचा प्रवास मी खूप जवळून अनुभवला आहे. परिस्थिती पुढे कधीच नतमस्तक न होता जिद्दीने प्रत्येक समस्यांवर मात करिता तो धावत राहिला. बहुजन रंगभूमीचा हरहुन्नरी चतुरस्र रंगकर्मी आहे. यश गाठूनसुद्धा तो आजही रंगभूमीला विसरला नाही.
-वीरेंद्र गणवीर, संचालक
बहुजन रंगभूमी. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com