नागपुरात हत्तीपायावर यशस्वी शस्त्रक्रिया, पाच महिन्यानंतर पाय सामान्य

केवल जीवनतारे
Thursday, 8 October 2020

हत्तीपाय(लिम्फेडेमा)हा आजार झाल्यानंतर काही काळानंतर रक्तवाहिन्या बंद होतात. यामुळे शरीरावर सूज येऊ लागते आणि हळूहळू पाय व हाताचा आकार वाढतो. रुग्णाला पुरळ येतात तसेच हातापायाची त्वचा जाड होते.

नागपूर : नागपुरात हत्तीपायाच्या(लिम्फेडेमा)रुग्णांवर प्लॅस्टिक सर्जन डॉ. सुरेश चवरे यांनी अत्यंत दुर्मीळ आणि अनोखी शस्रक्रिया यशस्वी केली. छिंदवाडा येथील राकेश(बदललेले नाव)यांच्या पायावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून यासाठी तब्बल बारा तास लागले. मध्यभारतात ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. 

हत्तीपाय(लिम्फेडेमा)हा आजार झाल्यानंतर काही काळानंतर रक्तवाहिन्या बंद होतात. यामुळे शरीरावर सूज येऊ लागते आणि हळूहळू पाय व हाताचा आकार वाढतो. रुग्णाला पुरळ येतात तसेच हातापायाची त्वचा जाड होते. हळूहळू रुग्णाचे चालणे फिरणे कठीण होते. दैनंदिन काम करणे देखील अवघड होते. अनेकदा हात पाय कापण्याची वेळ येते. फायलेरियासिस हे भारतातील हत्तीपायाचे मुख्य कारण आहे. ही शस्त्रक्रिया करताना व्हॅस्क्यूलराइज्ड लिम्फ नोड ट्रान्सफर या नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे, असे डॉ. चवरे म्हणाले. या शस्त्रक्रियेत काखेतील किंवा जांघेमधील लिम्फ नोड मायक्रोस्कूलर शस्त्रक्रियेद्वारे रोग असलेल्या हात किंवा पायात प्रत्यारोपण केले जाते. सुमारे १२ तास शस्त्रक्रियेला लागले असल्याचे डॉ. चवरे म्हणाले. शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ गिरीश ठाकरे आणि डॉ. मिनाक्षी हांडे यांच्यासह डॉ. प्रियदर्शन हांडे आणि डॉ.राजेश सिंघानिया यांनी मदत केली. राजकुमार, संतोष, सुखदेव आणि चंदा यांचेही सहकार्य लाभले. 

हेही वाचा - आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर, कोरोना संकटात तीन रुग्णालयातील सेवा विस्कळीत

चार महिन्यांतर परिणाम -
शस्त्रक्रियेनंतर तब्बल चार ते पाच महिन्यानंतर रुग्णाचे पाय सामान्य होऊ लागतात. छिंदवाडा येथील राकेश यांच्या पायावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर पाच महिन्यांनी त्यांचा पाय सामान्य झाला. सहा ते सात वर्षांपासून हत्तीपायांनी पीडित होते. राकेश यांच्या पायावरची ९० टक्के सूज उतरली आहे. 

हेही वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

भविष्यात हत्तीपायावरील शस्त्रक्रियांसाठी लिम्फ नोड ट्रान्सफर वरदान -
हत्तीपायच्या आजारावर नियंत्रण ठेवणे हाच एक पर्याय होता. परंतु, व्हॅस्क्युलर लिम्फ नोड ट्रान्सफर ही हत्तीपायावर(लिम्फडेमा)केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. भविष्यात हत्तीपायावरील शस्त्रक्रियांसाठी हे एक वरदान ठरणार आहे. राकेश यांचा पाय सामान्य स्थितीत येण्यासाठी पाच ते सहा महिने लागले. सध्या दोन्ही पाय सामान्य दिसतात. 
- डॉ. सुरेश चवरे, प्लॅस्टिक सर्जन, केशरोपण तज्ज्ञ, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: successful surgery on lymphedema patient in nagpur