मुलगा रागाच्या भरात काहीही बोलतो, असे समजून पालकांनी केले दुर्लक्ष आणि... 

अनिल कांबळे 
गुरुवार, 25 जून 2020

दहावी झाल्यावर मुलाला मोबाईल घेऊन देण्याचे आश्‍वासन पालकांनी दिले होते. मात्र, दहावीचा निकालच आला नसल्याने निकाल येईपर्यंत थांबण्यासाठी पालकांकडून त्याला सांगण्यात येत होते. परंतु मुलगा सतत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावायचा.

नागपूर :  "मला मोबाईल घेऊन न दिल्यास मी आत्महत्या करीन', अशी धमकी नयन आई-वडिलांना वारंवार द्यायचा. मात्र, लहान मुले रागाच्या भरात असे काहीही बोलतच असतात, असे समजून त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष केले. तसेही त्याला दहावीनंतर मोबाईल घेऊन देण्याचे आश्‍वासन दिले आहे अद्याप निकाल हाती यायचा आहे, हाही विचार त्यांच्या मनात होता. मात्र, आपले आई-वडील आपल्यावर प्रेमच करीत नसल्याची भावना नयनच्या मनात निर्माण झाली. 

दहावी झाल्यावर मुलाला मोबाईल घेऊन देण्याचे आश्‍वासन पालकांनी दिले होते. मात्र, दहावीचा निकालच आला नसल्याने निकाल येईपर्यंत थांबण्यासाठी पालकांकडून त्याला सांगण्यात येत होते. परंतु मुलगा सतत मोबाईल घेऊन देण्यासाठी तगादा लावायचा. मोबाईल न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही द्यायचा.

अधिक माहितीसाठी -प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?
 

शेवटी मुलाने घरात सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात घडली. नयनकुमार इंद्रकुमार मगनानी (वय 15, हेमू कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार मगनानी शहरातील नामांकित बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. त्यांचा मुलगा नयनकुमार दहावीचा विद्यार्थी असून, त्याला मोबाईलचे खूप वेड होते. घरात आईचा मोबाईल घेऊन तो सतत खेळत रहायचा. आता त्याला स्वत:च्या हक्‍काचा मोबाईल हवा होता. त्याने आई-वडिलांना मोबाईल घेऊन मागितला होता. मात्र, त्यांनी दहावी पास झाल्यावर मोबाईल घेऊन देईल, असे आश्‍वासन नयनला दिले होते. 

क्लिक करा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत
 

गेल्या काही दिवसांपासून नयन मोबाईलसाठी सतत आईकडे तगादा लावायचा. मात्र, त्याच्या मागणीकडे आई-वडिलांनी दुर्लक्ष केले. मुलाने हट्ट केल्याने त्याची समजूत घालून वेळ मारून नेण्यात आली. शेवटी त्याने बुधवारी दुपारी साडेचार वाजता घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. खूप वेळ झाला तरी नयन बाहेर आला नाही, म्हणून त्याची आई रूममध्ये गेली असता मुलाला फॅनला अडकलेल्या अवस्थेत पाहून त्यांना धक्‍काच बसला. त्यांनी जोरात हंबरडा फोडला. नयनच्या आत्महत्येप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 
 

मुलांना नाही ऐकायची सवय लावा 
लहान मुले भावनिक असतात. त्यांच्याशी संवाद साधून केवळ समजूत घालून वेळ मारून न नेता त्याला पटवून देणे महत्त्वाचे आहे. मोबाईलसारख्या आभासी जगात वावरण्यात लहान मुलांना रस असतो. त्यांच्या मनाशी स्वतःला जुळवून घ्यावे लागते. मुलांना नाही ऐकायची सवय लावली पाहिजे. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण करू नये, तशी सवय लावावी. अन्यथा मुले अतिरेकी पाऊल उचलतात. 
- प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ज्ञ) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a 10th standard student for not giving a mobile