esakal | आत्महत्या की हत्या, यावरून तापले वातावरण, काय प्रकरण आहे, वाचाच...
sakal

बोलून बातमी शोधा

file

प्रारंभी 'आत्महत्या', असे जिचे वर्णन केले जात होते, त्या थडीपवनी येथील अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूच्या घटनेला आता थेट 'हत्या' असे संबोधले जाऊ लागल्याने विविध प्रकारच्या चर्चांना ऊत आला आहे. या प्रकरणाला राजकीय वळण मिळताना दिसत असून, या प्रकरणाच्या माध्यमातून नेमके कुणाला "टार्गेट' केले जात आहे, या संबंधीची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणामागची चौकशी "सीबीआय'कडे द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने हे प्रकरण पुढे काय वळण घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

आत्महत्या की हत्या, यावरून तापले वातावरण, काय प्रकरण आहे, वाचाच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा(जि.नागपूर):  तशी ही घटना गेल्या 28 मे रोजी घडली. नरखेड तालुक्‍यातील पिंपळधरा येथील अरविंद जनार्दन बन्सोड (वय 32) या युवकाचा पं.स.सदस्य मयूर उमरकर यांच्याशी कथित वाद झाला. त्यातून 27 मे रोजी अरविंदने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. या प्रकरणी मयूर उमरकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेवरून तालुक्‍यातील राजकीय वातावरण भयंकर तापले असून मृत अरविंद हा "युवक बहुजन विकास आघाडी'चा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : खासगी केंद्रावर होते कापूस उत्पादकांची लुबाडणूक, किमतीत तब्बल इतकी तफावत

"ऍट्रॉसिटी' गुन्हा दाखल
थडीपवनी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य मिथिलेश ऊर्फ मयूर उमरकर यांची गॅस एजन्सी आहे. त्या कार्यालयाचे अरविंद याने फोटो काढले. या कारणावरून उमरकर व अरविंद यांच्यात वाद झाला. या वादातून अरविंदने कीटकनाशक प्राशन केले, असे सांगतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादारम्यान अरविंद बनसोड याचे 28 मे रोजी रात्री निधन झाले. त्यावरून पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव व जलालखेड्याचे ठाणेदार दीपक डेकाटे यांनी उमरकर व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. आता या गुन्ह्याच्या कलमात "अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमा'च्या (ऍट्रॉसिटी) कलमाची वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : सावधान... सापांसोबत स्टंट केल्यास गुन्हा

सामाजिक संघटनांची निदर्शने
सुरुवातीला आत्महत्येची घटना, असे तिचे वर्णन केले जात होते.आता तिचा 'हत्या' असा उल्लेख होऊ लागला आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही यात उडी घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी निवेदने, निदर्शने व मागण्या होत आहेत. आरोपी मयूर उमरकर हा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडोपंत उमरकर यांचा मुलगा आहे. बंडोपंत उमरकर हे गृहमंत्री अनिल देशमुखांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. पुढच्या काळात फक्त राजकारण होते, की वस्तुस्थिती उघड होऊन न्यायाची बाजू वरचढ ठरते, हे दिसणार आहे.

आनंदाची बातमी: भूमीपुत्रांच्या रोजगाराचा पुनश्‍च हरिओम

कट असल्याचा नातेवाईकांचा आरोप
अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्‍यता दिसत असताना पोलिसांनी आत्महत्या म्हणून या प्रकरणाची नोंद केली, असा नातेवाइकांचा आरोप आहे. अरविंद स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेची कामे करायचा. या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली, असा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे.

बहुजन आघाडीचे निवेदन
जलालखेडा पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. आठवडा होऊनदेखील संबंधित आरोपींची साधी विचारपूस व त्यांना अटक न केल्याने संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीने निवेदनातून केली आहे.

सीबीआय तपास व्हावा : प्रकाश आंबेडकर
अरविंद बन्सोड याची हत्या झाली असून, पोलिसांमार्फत आत्महत्या झाल्याचे जाणीवपूर्वक पसरविले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली असल्याचे वृत्त एका पोर्टलने दिले आहे.

सखोल चौकशी करणार : गृहमंत्री
या तरुणाच्या मृत्यूची पारदर्शक व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूचा तपास आधी पोलिस निरीक्षक जलालखेडा करीत होते. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच सखोल चौकशी व्हावी याकरिता काटोलचे वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मिथिलेश उमरकरवर "ऍट्रॉसिटी'सह आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा आधीच दाखल करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित लोकांचे बयाण
अरविंद बन्सोड या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच "ऍट्रॉसिटी'चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित लोकांचे कलम 164 नुसार बयाणसुद्धा घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पारदर्शी तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राकेश ओला
पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण