‘आरोप करणाऱ्यांना माझी क्षमता वर्षभरात कळेल'; नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंची विशेष मुलाखत 

मंगेश गोमासे
Sunday, 27 September 2020

अलीकडे तर कुलगुरू यांच्याकडेही पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून बघितले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी सकाळने साधलेला संवाद.

नागपूर ः विद्यापीठाचे कुलगुरुपद म्हणजे काटेरी मुकुटच. अध्यापनासोबत राजकारणही येथे सांभाळावे लागते. चांगला निर्णय घेतानाही दहावेळा विचार करावा लागतो. तरीही सर्वांचे समाधान होत नाही. अलीकडे तर कुलगुरू यांच्याकडेही पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून बघितले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी सकाळने साधलेला संवाद.

प्रश्न ः कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर आपल्यावर झालेल्या आरोपांना काय उत्तर द्याल ?

कुलगुरु ः ज्यांची निवड झाली नाही अशांकडून आरोप होतच असतात. येत्या वर्षभरात कामातून माझी क्षमता काय आहे हे त्यांना नक्कीच दिसेल. कुलगुरू हे पद प्रशासकीय असल्याने त्यावर ‘अकॅडमिक' व्यक्तीपेक्षा प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीची निवड व्हावी असे मला वाटते.

नाव, वय आणि धर्मामध्ये बदल करायचा आहे? चिंता करू नका; आता आले पर्यावरणपूरक ऑनलाइन 'राजपत्र'!

प्रश्न ः ‘एनआयआरएफ रँकिंग' वाढविण्यासाठी काही उपाययोजना केल्यात काय?

कुलगुरू ः पंधरा बाबींवर चर्चा करून त्यावर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच ‘एनआयआरएफ'साठी रामदेवबाबा अभियांत्रिकीचे डॉ. देशकर आणि वायसीसीईचे डॉ. अनंत पांडे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. त्यासंबंधी आवश्यक ती माहिती गोळा करणे सुरू आहे. माहिती येताच ५ ऑक्टोबरपासून प्रेझेंटेशनला सुरुवात करण्यात येईल.

प्रश्न ः अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी काय सोयी देणार?

कुलगुरु ः अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची एमसीक्यू पद्धतीने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी टास्क फोर्स तयार करून उपाययोजनांवर भर दिला. 'आरटीएमएनन्यू परीक्षा' हे ॲप विकसित करणारे नागपूर विद्यापीठ एकमेव विद्यापीठ आहे. ‘लो स्पीड इंटरनेट' वरही विद्यार्थ्यांना परीक्षा देत येईल. त्यानंतर लवकरात लवकर निकाल घोषित केला जाईल. यासाठी खासगी ‘एजन्सी‘ला कंत्राट दिलेले नाही.

प्रश्न ः ऑनलाइन विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार ?

कुलगुरू ः ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणे शक्य झाले नाही, त्यांना ऑफलाइन परीक्षा देत येईल. त्यासाठी त्यांच्या जवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. ही परीक्षाही एमसीक्यू पद्धतीनेच होईल.

'असा' मिळाला भारतीय ऊसाला गोडवा; हे मिळवून देणारी शास्त्रज्ञ आहे तरी कोण?

प्रश्न ः शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काय करणार ?

कुलगुरू ः काही दिवसांपूर्वी नागपूरला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आले असताना त्यांच्यासमोर ही बाब मांडली. त्यांनी पुढल्या महिन्यात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरतील अशी अपेक्षा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday Special interview of RTMNU Vice chancellor Subhash Chaudhary