मायलेकींचे आत्महत्या प्रकरण : पंखा दुरुस्त न केल्याने झाला होता वाद, एका पाठोपाठ घेतली पाण्यात उडी

अनिल कांबळे
Sunday, 18 October 2020

सततच्या मारहाणीला कंटाळून संतापाच्या भरात तिन्ही मायलेकी घरून पायीच घरून निघाल्या. रात्री नऊ वाजता तिघीही तलावाच्या पायऱ्यांवर बसल्या. ९ ते १२ वाजेपर्यंत मोठ्या मुलीने आई आणि बहिणीला समजाविले. पायी जात असतानाही ती समजूत घालत होती. मात्र, श्वेतल आई आणि बहिणीला समजवण्यात अपयशी ठरली.

नागपूर : दोन दिवसांपूर्वी युवतीच्या डोळ्यादेखतच आई व बहिणीने अंबाझरी तलावात उडी घेत आत्महत्या केली होती. कौटुंबिक कलहातून दोघींनी टोकाचे पाऊन उचलल्याची माहिती पुढे येत होती. आत्महत्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी थोरली मुलगी श्वेतल हीचे बयान नोंदवून घेतले. सविता खंगार (४५) द रुचिता खंगार (२०) असे आत्महत्या करणाऱ्या मायलेकींची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही क्षुल्लक कारणावरून काका नेहमीच भांडण करायचा. तसेच आईला मारहाणही करायचा. श्वेतल (२२) ही या घटनेची साक्षीदार आहे. श्वेतल ही बीएडची विद्यार्थिनी आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सुध्दा काकाने त्यांच्याशी वाद घातला. पंखा दुरुस्त करून आणला नाही, असे क्षुल्लक कारण होते. याच कारणावरून काकाने आईसोबत भांडण केले. यावरून आई आणि रुचिताला मारहाण केली, असे श्वेतलने पोलिसांना सांगितले.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

सततच्या मारहाणीला कंटाळून संतापाच्या भरात तिन्ही मायलेकी घरून पायीच घरून निघाल्या. रात्री नऊ वाजता तिघीही तलावाच्या पायऱ्यांवर बसल्या. ९ ते १२ वाजेपर्यंत मोठ्या मुलीने आई आणि बहिणीला समजाविले. पायी जात असतानाही ती समजूत घालत होती. मात्र, श्वेतल आई आणि बहिणीला समजवण्यात अपयशी ठरली. अखेर १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास मायलेकींनी तलावात उडी घेत आत्महत्या केली. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रोजच उडायचे खटके

खंगार कुटुंब विद्यनगर, वाठोडा ले-आऊट येथील रहिवासी आहे. पती राजू हे संगणक ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. राजू यांचे भावासोबत वाद सुरू आहे. त्यातून रोजच खटके उडायचे. दररोज होणाऱ्या वादाला सवितासह त्यांच्या मुलीही कंटाळल्या होत्या. गुरुवारीसुद्धा त्यांच्यात वाद झाला होता. संताप अनावर झाल्याने तिन्ही मायलेकी घरून पायीच निघाल्या. यानंतर आई आणि बहिणीने एका पाठोपाठ पाण्यात उडी घेतली.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

श्वेतलने केला होता समजवण्याचा प्रयत्न

रोजचीच कटकट असल्याने जगून उपयोग नाही. सामूहिक आत्महत्या हाच पर्याय आहे. त्यातूनच चिर शांतता लाभेल यावर सविता आणि रुचिता ठाम होत्या. श्वेतलने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हातपाय जोडून त्यांचे मन वळिवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला. परंतु, दोघीही एकूण घेण्याच्या स्थितीत नव्हता. श्वेतलचे प्रयत्न सुरू असतानाच रात्री १२.३० च्या सुमारास आई आणि बहिणीने एका पाठोपाठ पाण्यात उडी घेतली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Svetlana's statement was recorded by the police