
अवघ्या दहा वर्षांच्या स्वराने आतापर्यंत देहरादून व कटकसह अनेक ठिकाणच्या स्पर्धांमध्ये मेडल्स व ट्रॉफीज जिंकल्या आहेत.
नागपूर : मुलांच्या यशात जेवढी मेहनत त्या मुलांची असते, तेवढेच योगदान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या मायबापांचेही असते. विकास गडेलवार हे त्यापैकीच एक. मुलीला तिचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी विकास हे स्वतः नृत्य शिकले. मुलीनेही देशभरातील अनेक नृत्य स्पर्धा जिंकून पित्याची मेहनत फळाला आणली.
हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच घरातील चौघींवर बलात्कार, भूत उतरविण्याचा केला होता बहाणा
नागपूर पोलिसच्या अँटी करप्शन विभागात कार्यरत असलेले विकास गडेलवार यांची मुलगी स्वरा ही उत्तम नृत्य सादर करते. गेल्या तीन वर्षांपासून कोरिओग्राफर अपूर्वा काकडे यांच्या मार्गदर्शनात नृत्याचे धडे घेत असलेल्या स्वराला लावणी व लोकनृत्याची खूप आवड आहे. अवघ्या दहा वर्षांच्या स्वराने आतापर्यंत देहरादून व कटकसह अनेक ठिकाणच्या स्पर्धांमध्ये मेडल्स व ट्रॉफीज जिंकल्या आहेत. शिवाय 'शहजादे हुनर के' या शोच्या निमित्ताने नुकत्याच नागपुरात आलेल्या सुधा चंद्रन व झीनत अमानसारख्या सेलिब्रिटीकडूनही वाहवा मिळविली आहे. उल्लेखनीय म्हणजे स्वराची लवकरच छोट्या पडद्यावर येणाऱ्या एका रिऍलिटी शोसाठी निवड झाली आहे.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
गायत्री कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकणाऱ्या स्वराने वयाच्या सातव्या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. अभ्यासाव्यतिरिक्त ती रोज दोन ते तीन तास नृत्याचा सराव करते. स्वरा आपल्या गुरूंकडून तर नृत्याचे बारकावे शिकत आहेच, शिवाय तिचे वडीलही आपली ड्युटी सांभाळून तिला वेळोवेळी सरावात मदत करीत असतात. संगीताची आवड असलेले विकास हे स्वतः उत्तम नृत्य करतात व गायक कलावंत असून, मुलींप्रमाणे त्यांनीही अनेक पुरस्कार जिंकले आहेत. स्वराला भविष्यात 'डांसिंग स्टार' बनायचे असून, कोरिओग्राफर म्हणूनही तिला आपली ओळख निर्माण करायची असल्याचे विकास यांनी सांगितले.
'स्वराला लहानपणापासूनच नृत्याची खूप आवड आहे. त्यामुळे आम्हीही तिला प्रोत्साहन देत गेलो. नृत्य क्षेत्रात करिअर करण्याची तिची इच्छा असून, ती भविष्यात नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करेल, अशी आम्हाला आशा आहे.'
-विकास गडेलवार, स्वराचे वडील