टाकाऊपासून टिकाऊ, शिक्षकानं विद्यार्थ्यांसाठी तयार केलंय हॅण्डवॉश सेंटर

टीम ई सकाळ
Tuesday, 3 November 2020

विद्यार्थ्यांना हात धुणे सोईचे व्हावे, यासाठी सहाय्यक शिक्षक खुशाल कापसे यांनी टाकाऊ साधनांचा उपयोग करून हे हॅण्डवॉश स्टेशन तयार केले. दीड फूट बाय सव्वा फूट आणि चार फूट उंच, अशी लोखंडी चौकट तयार करून घेतली.

नागपूर - कोरोना महामारीच्या काळात वारंवार हात धुणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. त्यासाठी सहज साधन उपलब्ध व्हावे यासाठी पारशिवनी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथील शिक्षकाने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि आकर्षक अशा हॅण्डवॉश स्टेशनची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे हॅण्डवॉश सेंटर स्वस्त देखील आहे.

साबणाने वारंवार हात धुण्याने अनेक रोगांबरोबरच कोरोनासारख्या महामारीचे संक्रमण थांबवले जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी दशेतच हात धुण्याबाबत जागृती करण्यासाठी 'जागतिक हात धुवा दिना'च्या निमित्ताने अनेक उपक्रम राबविले गेले. विद्यार्थ्यांना हात धुणे सोईचे व्हावे, यासाठी सहाय्यक शिक्षक खुशाल कापसे यांनी टाकाऊ साधनांचा उपयोग करून हे हॅण्डवॉश स्टेशन तयार केले. दीड फूट बाय सव्वा फूट आणि चार फूट उंच, अशी लोखंडी चौकट तयार करून घेतली. पाणी भरून ठेवण्यासाठी पेंटच्या निरुपयोगी बादलीचा वापर करून त्याला नळाची तोटी बसविली. तसेच हात धुण्यासाठी स्टील बेसिन लावली. हात धुतल्यानंतर त्यातून जाणारे पाणी वाया जाणार नाही याचीही विशेष काळजी घेतली. ते पाणी झाडांना जाण्यासाठी सायकलचा निरुपयोगी ट्युब लावला. 

हात धुण्याची योग्य पद्धत, हात धुण्याचे फायदे सांगणारे घोषवाक्य असलेले बॅनर लावून त्याला स्वच्छतेचा संदेश देणारे शैक्षणिक साहित्यही बनविले. सध्या कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वारंवार हात धुणे, मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी या हॅण्ड वॉश स्टेशनचा निश्‍चितच उपयोग होणार आहे. खुशाल कापसे यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सरपंच चक्रधर महाजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राष्ट्रपाल बोंबले, मुख्याध्यापिका नलिनी ठाकरे यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी हॅण्डवॉश सेंटरची निर्मिती -

आता शाळा बंद आहेत. मात्र, जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तसेच इतरही साथरोग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना वारंवार हात धुणे गरजेचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सुलभ असे हॅण्डवॉश स्टेशन असावे व त्यातूनच स्वच्छतेचे महत्त्व आणि जल व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हॅण्डवॉश स्टेशनची निर्मिती करण्यात आली.
- खुशाल कापसे, सहाय्यक शिक्षक, जि.प. प्राथ. शाळा गरंडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teacher made hand wash center from waste material in parshivani of nagpur