पहाटे उठून सडा व रांगोळी टाकताय... ही घ्या काळची...

crime
crime

नागपूर : पहाटे अंधारात एकाकी महिलांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीने दक्षिण नागपुरात दहशत निर्माण केली. लागोपाठ दोन दिवसांत लूटमारीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. नंदनवन, वाठोडा व हुडकेश्‍वर हद्दीत या घटना घडल्या.

नंदनवन हद्दीतील ईश्‍वरनगरातील जट्टेवार सभागृहामागील रहिवासी बेबी राठोड (63) नियमित योगाभ्यासासाठी जात असतात. शुक्रवारीसुद्धा पहाटे 5.35 वाजता त्या योगासाठी जवाहर वसतिगृहाच्या सभागृहात जाण्यासाठी निघाल्या. घरापासून काही अंतरावर असतानाच 25 ते 35 वर्षे वयोगटातील तीन अनोळखी आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलने आले. चाकूचा धाक दाखवीत त्यांना थांबवले आणि सोन्याच्या बिऱ्या, मंगळसूत्र, मोबाईल व 200 रुपये रोख हिसकावून पळून गेले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरत जाऊन एकच खळबळ उडाली.

या घटनेनंतर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने वाठोडा हद्दीतही दुसरी घटना घडली. बिरसानगरातील रहिवासी विद्या सहारे (41) या घराजवळील उद्यानाच्या मार्गावर पायी फिरत होत्या. तीन अनोळखी आरोपी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले. सहारे यांना चाकूचा धाक दाखविला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. पण सहारे यांनी विरोध केल्याने मंगळसुत्राचा अर्धवट भागच चोरट्यांच्या हाती लागला. सहारे या आरडाओरड करीत असल्याने आरोपी पळून गेले.

गहुमण्यांची माळ हिसकावली
हुडकेश्‍वर हद्दीतील अमृता अपार्टमेंट, सरस्वतीनगरात राहणाऱ्या दुर्गा नागपुरे (30) या गुरुवारी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास अपार्टमेंटच्या गेटसमोर रांगोळी काढत होत्या. अचानक एक मोटारसायकलवरून तीन आरोपी त्यांच्याजवळ येऊन थांबले. चाकूचा धाक दाखवीत दागिन्यांची मागणी केली. नागपुरे यांनी आरडाओरड करताच आरोपींनी त्यांना जखमी करीत गळ्यातील गहुमण्यांची माळ हिसकावून पोबारा केला.

आरोपी एकच असल्याचा अंदाज
संबंधित पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे. आरोपींची संख्या आणि लुटण्याची पद्धत सारखीच असल्याने तिन्ही घटनांमधील आरोपी समान असावेत, असा कयास लावला जात आहे. गुन्हेशाखेच्या पथकानेसुद्धा या घटनांचा समांतर तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com