गोलमाल है भई सब गोलमाल है...विद्यापीठाने केले सराव परीक्षेचेच प्रश्‍न कॉपीपेस्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

सराव परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांशी मिळतीजुळती आढळून आलीत. याबाबत विद्यापीठाला तक्रार मिळताच, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. जी. एस. खडेकर यांनी चौकशी केली. त्यात जवळपास संपूर्ण प्रश्‍न जसेच्या तसे असल्याचे आढळून आले.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा आणि मॉडेल आन्सरशीटमध्ये असलेले प्रश्‍न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जसेच्या तसे उतरल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी विद्यापीठाने दोन्ही प्रकरणांची चौकशी जवळपास पूर्ण केली असून पुढील कारवाईसाठी प्रकरण परीक्षा मंडळाकडे पाठविले आहे.

विद्यापीठाच्या औषधीनिर्माण अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असताना तिसऱ्या सेमिस्टरमधील "ऑर्गेनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री' या विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र, या पेपरमध्ये आलेले संपूर्ण प्रश्‍न जसेच्या तसे महाविद्यालयाद्वारे ज्यात 6 डिसेंबर 2019 रोजी महाविद्यालयात पार पडलेल्या सराव परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांशी मिळतीजुळती आढळून आलीत. याबाबत विद्यापीठाला तक्रार मिळताच, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. जी. एस. खडेकर यांनी चौकशी केली. त्यात जवळपास संपूर्ण प्रश्‍न जसेच्या तसे असल्याचे आढळून आले.

सविस्तर वाचा - नागपुरच्या डॉनने लावली व्यापाऱ्याच्या डॉक्‍याला पिस्तुल...मग झाले असे

दुसऱ्या प्रकरणात सेंट व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सेट करणाऱ्या प्राध्यापकाने 22 नोव्हेंबर रोजी "अभियांत्रिकी रसायनशास्त्र' या विषयातील मॉडेल आन्सर विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. विशेष म्हणजे या विषयाचा 7 डिसेंबर रोजी पेपर घेण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विद्यापीठाद्वारे डॉ. प्रफुल्ल साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. जी. एस. खडेकर यांच्या समावेश असलेली समिती चौकशी करीत आहे. ही दोन्ही प्रकरणे गंभीर असल्याने पुढील कारवाईसाठी परीक्षा मंडळाकडे पाठविण्याचे ठरविले. पुढे हे प्रकरण शिस्तपालन समितीकडेही जाणार आहे. मात्र, विद्यापीठाकडून दोन्ही प्राध्यापकांना परीक्षेच्या कामापासून काढून टाकण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Test exam's questions repet in Universiti final examination