esakal | पाच लाखांची लाच मागितल्यामुळे सहायक आयुक्ताला अटक; सिक्युरिटी गार्डचे वेतन काढण्यासाठी पैशाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Textiles Assistant Commissioner Yogesh Bakre has been arrested in Nagpur for soliciting a bribe of Rs five lakh

नागपुरातील सहकारी सुतगिरणी येथे तक्रारदार संचालकाचे आठ सुरक्षारक्षक तैनात आहेत.

पाच लाखांची लाच मागितल्यामुळे सहायक आयुक्ताला अटक; सिक्युरिटी गार्डचे वेतन काढण्यासाठी पैशाची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सुतगिरणीतील सुरक्षारक्षकांचे वेतन काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वस्त्रोद्योग विभागातील सहायक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. योगेश वासुदेवराव बाकरे (वय ४४ रा. नंदनवन) असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे. ‘एसीबी’च्या या कारवाईमुळे वस्त्रोद्योग विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तक्रारदार मानेवाड्यातील ज्ञानेश्वरनगर भागात राहातो. त्याची सिक्युरिटी एजन्सी आहे. 

हे ही वाचा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात अडकले पर्यटन; चारऐवजी सहा पर्यटकांना भ्रमंतीच्या परवानगीची प्रतिक्षा  

नागपुरातील सहकारी सुतगिरणी येथे तक्रारदार संचालकाचे आठ सुरक्षारक्षक तैनात आहेत. ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीतील ३४ लाख ५५ हजार ९४४ रुपये तसेच डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० यादरम्यानचे नऊ लाख ४६ हजार ८३२ रुपये वेतन थकीत होते. थकीत वेतनाचे बिल काढण्यासाठी संचालकाने सिव्हिल लाइन्समधील वस्त्रोद्योग आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज केला. हे बिल काढण्यासाठी तक्रारदाराने आयुक्तांचे स्वीय सहाय्यक नितीन वर्मा यांची भेट घेतली. वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी वर्मा यांनी संचालकाला सात लाख रुपयांची लाच मागितली. एवढी रक्कम देण्यास संचालकाने असमर्थता दर्शविली. पाच लाख रुपये दिल्याशिवाय वेतनाचे बिल काढणार नाही,असे वर्मा यांनी संचालकाला सांगितले. 

हे ही वाचा : जलशुद्धीकरण केंद्रात भ्रष्टाचार 

संचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भावना धुमाळे यांनी तक्रारीची पडताळणी केली. वर्मा यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. १२ नोव्हेंबर २०२० ला एसीबीने वर्मा यांना अटक केली. वर्मा यांच्या चौकशीदरम्यान तीन लाख रुपये बाकरे यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार व वर्मा यांच्या संभाषणातही बाकरे यांचा उल्लेख झाला. सोमवारी ‘एसीबी’ने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून बाकरे यांना अटक केली. बाकरे यांची २७ जानेवारीपर्यंत एसीबी कोठडी घेण्यात आली आहे.

go to top