बारा वर्षांपासून थडीपवनी उपसा योजनेच्या प्रकल्पाला मुठमाती, काय आहेत अडचणी...

file
file


जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेल्या अंबाडा (सायवाडा), थडीपवनी यासह आठ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न भेडसावत राहत आहे. या भागात सिंचनाच्या पाहिजे त्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना एका पिकावर समाधान मानावे लागत आहे. यामुळे हा भागदेखील सिंचनाखाली यावा यासाठी सन 2018 मध्ये थडीपवनी उपसा सिंचन योजनेच्या मध्यम प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण, याला बारा वर्षे होऊनही मंजुरी मिळाली नाही. आता ती केव्हा मिळणार, हा खरा प्रश्न आहे.

अधिक वाचा : रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

प्रस्ताव 2009मध्ये तयार
नरखेड तालुक्‍यातील वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंबाडा, सायवाडा, खारगड, थडीपवनी, बरडपवनी, बानोर (चंद्र), दावसा, खेडी, साखरखेडा व सिंजर या गावातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून थडीपवनी उपसा सिंचन योजना या मध्यम प्रकल्पाचा प्रस्ताव सन 2009 मध्ये तयार करण्यात आला होता. पण, या प्रकल्पाला म.स.चि.स. नाशिककडून अपर वर्धा प्रकल्पातून पाणीउपसा करण्याची परवागी अद्याप मिळाली नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे व शेतकरी याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिक वाचा : निलंबित शिवसेना शहरप्रमुख कडवच्या पत्नीला

दोन हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार
नरखेड तालुक्‍यातील थडीपवनी उपसा सिंचन हा मध्यम प्रकल्प गोदावरी खोऱ्यातील वर्धा उपखोऱ्यामध्ये वर्धा नदीवर, वर्धा जिल्ह्यातील द्रुगवाडा गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तीरावर प्रस्तावित आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या जलाशयातून नदीपासून उचल विहिरीपर्यंत ओपन अँप्रोच चॅनेलच्या कामासह प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या योजनेत उचल विहिरीतून विद्युत पंपाद्वारे 4.89 किलोमीटर लांबीच्या 0.75 मीटर व्यासाच्या चढत्या जलवाहिनीद्वारे 380.95 मीटर पातळीवरील वितरण कुंडपर्यंत उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. उपसा केलेले पाणी पुढे कालवा वितरणप्रणालीद्वारे नरखेड तालुक्‍यातील काही गावांना सिंचनासाठी वापरण्याचे प्रस्तावित आहे. मुख्य कालव्याची लांबी 13.5 किलोमीटर असून त्यापैकी 4.80 किलोमीटर लांबीचा कालवा वनजमिनीतून जाणार आहे. यासाठी 10.07 वनजमीन संपादितदेखील करावी लागणार आहे. ही योजना झाल्यास दोन हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

हेही वाचा : बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाईन प्रत

प्रकल्पाचा समरूपता अभ्यास शासनास सादर
या योजनेचा पाणी वापर 7.53 द.ल.घ.मी. असून प्रकल्पास आवश्‍यक 7.53 द.ल.घ.मी. पाणी अमरावतीचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयातर्फे 21 जुलै 2009 अन्वये अप्पर वर्धा प्रकल्पातून उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, सोफिया प्रकल्पाच्या पाणीवापर घरून केलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या समरूपता अभ्यासास या प्रकल्पाची विश्वासार्हता 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी येत असल्याने या योजनेचा पाणीवापर घेऊन अप्पर वर्धा प्रकल्पाचा समरूपता अभ्यास शासनास सादर करण्यात आलेला आहे. याला शासनाची मान्यता प्राप्त होऊन योजनेस पाणी उपलब्ध झाल्यास या योजनेची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सन 2013-14 च्या जलसंपदा विभागाच्या दरसूचीनुसार प्रकाल्पाची अद्यावत किंमत 4990.711 रुपये असून लाभव्यय गुणोत्तर 3.57 आहे. ही योजना शासनाच्या मापदंडात बसत आहे. पण, योजनेस पाणी उपलब्ध करून देण्याचे सध्यातरी मान्य होत नसल्यामुळे मात्र शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी गेले आहे.

...तर सिंचनाचा प्रश्‍न निकाली निघणार
नुकतीच जलसंपदामंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात झालेल्या काटोल विधानसभा क्षेत्रातील सिंचन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत थडीपवनी उपसा सिंचन योजनेचा विषय चर्चेला आला. यावेळी सध्या अप्पर वर्धा प्रकल्पाचे सोफिया प्रकल्पाला जाणारे पाणी शिल्लक असल्यामुळे पाणी योजनेकरिता उपलब्ध होऊ शकते, असा विषय मांडण्यात आला. यामुळे नाशिकची परवानगी मिळाल्यास दहा गावांचा सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकतो.

पूर्णत्वास आणण्याचा मानस
ज्याप्रमाणे महाराष्टातील पहिले नायब तहसीलदार कार्यालय जलालखेडा येथे सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे ही योजनादेखील काही दिवसांत गृहमंत्री देशमुख यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास आणण्याचा मानस आहे.
-बंडोपंत उमरकर
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com