esakal | कोरोनाची लस जानेवारीत येण्याची चिन्हे? प्रशासनाची सुरु झाली लगबग; आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

there are signs that corona vaccine come in Jan

कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेत काम करणारे शहरातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत शासकीय तसेच खाजगी हॉस्पिटलशी चर्चा सुरू केली.

कोरोनाची लस जानेवारीत येण्याची चिन्हे? प्रशासनाची सुरु झाली लगबग; आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर ः राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकाच नव्हे तर विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा प्रशासनाची लगबग बघता जानेवारीत कोरोनावरील लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोरोनावरील लसीची प्रतीक्षा सुरू असतानाच महापालिका प्रशासनाने आरोग्य सेवेत काम करणारे शहरातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत शासकीय तसेच खाजगी हॉस्पिटलशी चर्चा सुरू केली. कोरोनावरील लस सर्वप्रथम आरोग्य सेवा देणाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरू असल्याचे मनपातील अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

कोरोनावरील लसीबाबत संपूर्ण जगात उत्सुकता आहे. त्यात केंद्र सरकारने राज्य सरकारांना लस वितरणाबाबत समित्या गठीत करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारने लस वितरणाबाबत यापूर्वीच सर्वच विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिकांना निर्देश दिले आहे. गुरुवारी येथील विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी शहरातील विविध खाजगी रुग्णालय संचालकांसोबत ऑनलाइन चर्चा केली. 

खाजगी हॉस्पिटलमध्ये किती कर्मचारी आहेत? याबाबत त्यांनी प्राथमिक आढावा घेतला. या बैठकीत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही उपस्थित होते. सर्व खाजगी डॉक्टरांना त्यांच्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची माहिती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या. शहरातील खाजगी हॉस्पिटल तसेच शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची माहिती महापालिका गोळा करीत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेनेही प्रक्रिया सुरू केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना कर्मचाऱ्यांची माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष रुग्णालये, महानगरपालिकेचे दवाखाने, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी कॉर्पोरेट हॉस्पिटल, खासगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नर्सिंग होम यांच्यासह शहरातील सर्वच नोंदणीकृत व अन्य रुग्णालयांनी सुद्धा माहिती सादर करणे बंधनकारक आहे. 

या आठवड्यात लसीकरणाबाबत महापालिका, जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकांचा धडाका सुरू होता. सध्या लसीबाबत विविध प्रयोग सुरू आहेत. काही प्रयोग अंतिम टप्प्यात असल्याने जानेवारीपर्यंत लस उपलब्ध होण्याचा अंदाज पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा

जागतिक आरोग्य संघटनेकडून केंद्र सरकारला, केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लसीचा पुरवठा होणार आहे. राज्य सरकार जिल्हा प्रशासन व महापालिकांना लस पुरवठा करणार आहे. परंतु नागपूरला लसीचे किती डोस मिळणार? याबाबत काहीही निश्चित नाही. शासकीय व खाजगी हॉस्पिटलमधील एकूण आरोग्य सेवकांच्या तुलनेत कमी डोस मिळाल्यास प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे.

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

शहरातील सर्वच रुग्णालय, इस्पितळे, दवाखान्यांना कर्मचाऱ्यांची माहिती देण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात सादर करणे अपेक्षित आहे. ही माहिती संकलित करून केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
- राम जोशी, 
अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top