उद्योगातील ऑक्सिजनमध्ये होणार आणखी कपात

There will be further reduction in oxygen in the industry
There will be further reduction in oxygen in the industry

नागपूर : वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे महापालिकेने ऑक्सिजनची सोय असलेले बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बेडकरिता ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या हेतूने महापालिकेने पाऊले उचलली आहे. उद्योगाला मिळणाऱ्या ऑक्सिजनपैकी निम्‍मे महापालिका रुग्णालयातील बेडसाठी ऑक्सिजन राखीव ठेवण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पालिकेच्या या प्रयत्नामुळे उद्योगातील ऑक्सिजनमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख तसेच ऑक्सिजनच्या अभावाने कोरोनाग्रस्तांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन रुग्णालयांना तर २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. राज्यात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे.

संत्रानगरीही अपवाद नाही. त्यामुळे शहरालाच नव्हे तर जिल्ह्याला तूर्तास आवश्यक ५५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. परंतु महापालिकेने शहरात कोविड हॉस्पिटल तसेच त्यातील ऑक्सिजनची बेडसंख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्तास ४२ खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये साडेतीन हजार बेडची व्यवस्था आहे.

सप्टेंबर महिन्याअखेरीस मनपाकडे मनपा रुग्णालयांचे ४०० बेड्स उपलब्ध होतील, असे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. याशिवाय उच्च न्यायालयाने कोविड हॉस्पिटलसंदर्भात तयार केलेल्या समितीपुढे आणखी ५८ खाजगी रुग्णालयांनी कोविड हॉस्पिटल म्हणून काम करण्याची सहमती दर्शविली. त्यामुळे सप्टेंबरअखेर बेडची संख्या आणखी वाढणार आहे.

एकाही कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या अभावाने कुणाचाही बळी जाऊ नये, यासाठी ऑक्सिजनचे बेड वाढविण्यात येणार आहे. शहरात १२० टन ऑक्सिजन तयार होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार ८० टक्के ऑक्सिजन रुग्णालयांसाठी तर २० टक्के ऑक्सिजन उद्योगासाठी वापरण्यात येत आहे. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने बेड वाढविण्यात येणार आहे.

त्यामुळे उद्योगाला देण्यात येणाऱ्या २० टक्क्यांपैकी निम्मे ऑक्सिजन शहरातील रुग्णालयांसाठी देण्याची विनंती महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला केली आहे. एकूणच कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पालिकेच्या विनंतीवरून उद्योगाच्या ऑक्सिजनमध्ये कपात करणार असल्याचे सूत्राने नमूद केले.

शहरात १२० टन ऑक्सिजनची निर्मिती
शहरात १२० टन ऑक्सिजन तयार होत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांनी नमूद केले. बुटीबोरीतील आयनॉक्स एअर प्रॉडक्टमध्ये ९५ ते ९७ टन ऑक्सिजन तयार होते. याशिवाय इतर पाच ते सहा प्रकल्पातून २० ते २५ टन ऑक्सिजन तयार होत असल्याचे खजांची म्हणाले.

महापालिकेने बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव बेडसाठी उद्योगाचे ऑक्सिजनमध्ये कपात करून रुग्णालयांसाठी देण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com