महापालिकेत नेतृत्त्वासाठी होणार रस्सीखेच; सुतकी वातावरणातही भाजपच्या दुसऱ्या फळीत उत्सुकता!

There will be a tug of war for Nagpur municipal Elecation leadership
There will be a tug of war for Nagpur municipal Elecation leadership

नागपूर : सव्वा वर्षाने होणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ता आल्यास नेतृत्त्वासाठी भाजपमधील दुसऱ्या फळीत उत्सुकता दिसून येत आहे. सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक असला तरी भाजपमधील अनेक नगरसेवकांनी आतापासूनच नेतृत्त्वासाठी मनसुबे बांधल्याचे दिसून येते. महापौर संदीप जोशी यांची महापालिकेच्या राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा आणि प्रवीण दटकेंच्या आमदारपदी ‘प्रमोशन’मुळे अनेक वर्षांपासून मनपात राहूनही कायम दुर्लक्षित असलेल्यांमध्ये भविष्यात मोठ्या पदाच्या अपेक्षांनीही घर केल्याचे दिसून येत आहे.

पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवाने तसेच गटातटाच्या राजकारणामुळे भाजपमध्ये सद्यस्थितीत सुतकी वातावरण आहे. या वातावरणातूनही महापालिकेत असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक, नगरसेविका म्हणून निवडून येत आहे. परंतु, आतापर्यंत समिती किंवा झोन सभापतीपर्यंतच मजल मारलेल्या नगरसेवक, नगरसेविकांच्या अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे.

मनपा निवडणुकीत प्रवीण दटके तसेच घोषणा केल्याप्रमाणे महापौर संदीप जोशीही शर्यतीत राहणार नाही. सव्वा वर्षाने होणारी महापालिका निवडणूक एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होण्याची शक्यता आहे. त्यानुसार आतापासूनच भाजपमधील अनेक नगरसेवकांनी वॉर्डच्या सीमेचे अंदाज बांधत काम करण्यास आता वेग दिला आहे.

पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये दोन गट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील निवडणुकीत भाजप सत्तेत येईल की नाही? हे भविष्याच्या गर्भात आहे. सत्तेत आल्यास दोन गटापैकी पदे वाटपात कुणाची सरशी होईल, याबाबत काहीही स्पष्ट नसले तरी अनेकांनी जोशी, दटके यांच्या अनुपस्थितीत कोणते मोठे पद मिळवता येईल, यासाठी आतापासून आराखडे तयार केले आहे.

पराभवाच्या सुतकी वातावरणातूनही अनेकांना काहीतरी अनुकूल घडेल, अशी आशा आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत सत्तेत आल्यास भाजपमध्ये पदांसाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निष्ठाही लागणार पणाला

पदवीधर निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे कारण सांगायला कुण्या राजकीय विश्लेषकाची गरज नाही. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून खापर फोडण्यासाठी इतर कारणांचाही शोध घेतला जात आहे. गटातटाच्या राजकारणामुळे भाजपमधील अनेक जण सध्या संभ्रमावस्थेत आहे. मात्र, याच पराभवातून काही नगरसेवकांनी सव्वा वर्षाने येणारी निवडणूक व त्यानंतर पदासाठी मनसुबे बांधले आहे. त्यामुळे भविष्यात पदाच्या लालसेने निष्ठा पणाला लावणारे पुढे येण्याची शक्यता आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com