आयुक्त मुंढेच्या बचावासाठी हे तीन पक्ष आले पुढे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

कोरोनाच्या काळात गेल्या तीन दिवसांपासून अधिकाऱ्यांना सभेत बसवून ठेवल्याप्रकरणी कमलेश चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुनेश्‍वर पेठे यांनी आतापर्यंत जे झाले ते झाले, परंतु पुढे नगरसेवकांची कामे व्हायला पाहिजे, नसेल होत तर ते सांगितले पाहिजे, असे नमूद करीत संवाद करण्याची सूचना आयुक्तांना दिली.

नागपूर : सत्ताधाऱ्यांकडून शनिवार, मंगळवार आणि आज बुधवार, या तिन्ही दिवशी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर विखारी टीका होत असताना कॉंग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्यांनी त्यांचा बचाव केला. कॉंग्रेसचे बंटी शेळके, कमलेश चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील नगरसेवकांची विकासकामे रोखल्यावरही बोट ठेवले. राष्ट्रवादीचे दुनेश्‍वर पेठे व शिवसेनेचे किशोर कुमेरिया यांनी अत्यावश्‍यक कामे सुरू करून नगरसेवकांसोबत संवाद सुरू करण्याची सूचना दिली. 

रेशीमबाग येथील कविवर्य महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी तसेच कॉंग्रेसच्या सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. मात्र, कॉंग्रेसचे दोन सदस्य बंटी शेळके आणि कमलेश चौधरी यांनी आयुक्तांचा बचाव करीत सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षातील नगरसेवकांची कामे रोखल्याचा आरोप केला.

कॉंग्रेसचे नितीन साठवणे व सेनेच्या मंगला गवरे यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेदरम्यान आतापर्यंत महापालिका रुग्णालयात केवळ दीडशे बेड होते, त्यात त्यांनी तीनशे बेडची भर घातली, हा आयुक्तांचा अपराध आहे काय?, गेल्या तीन महिन्यांत कोणते आभाळ कोसळले? असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला.

आयुक्तांमुळे कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असून देशभरात हा पॅटर्न लागू केला जात आहे, असे नमूद करीत त्यांनी आयुक्तांचा बचाव केला. कोरोनाच्या काळात गेल्या तीन दिवसांपासून अधिकाऱ्यांना सभेत बसवून ठेवल्याप्रकरणी कमलेश चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला. आयुक्‍त मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज व्यक्त करताना एका अधिकाऱ्याला सर्व मिळून घेरणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

शुभमंगल सावधान!..जाणून घ्या लग्नसोहळ्यांचे मुहूर्त

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुनेश्‍वर पेठे यांनी आतापर्यंत जे झाले ते झाले, परंतु पुढे नगरसेवकांची कामे व्हायला पाहिजे, नसेल होत तर ते सांगितले पाहिजे, असे नमूद करीत संवाद करण्याची सूचना आयुक्तांना दिली. मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत फोटो व्हायरला झाल्याने आयुक्तांवर टोलेबाजी झाली. मात्र, पेठे यांनी आयुक्तांना मंत्र्यांना भेटावेच लागले, असे नमूद करीत आयुक्तांचा बचाव केला.

त्यांनी सलून, चहाटपरी व लहान व्यावसायिकांना दुकानांसाठी परवानगी देण्याची मागणी केली. शिवसेनेचे कुमेरिया यांनीही आयुक्तांचे काम उत्तम आहे, परंतु संवादाची गरज असल्याचे सांगितले. साठवणे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी चौघांनीही केली. 
 
कॉंग्रेसच्या चार सदस्यांचे आयुक्तांवर शरसंधान 
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे, हरीश ग्वालवंशी, रमेश पुणेकर व संजय महाकाळकर यांनी आयुक्तांवर शरसंधान साधले. सहारे यांनी जनतेची कामे करीत असताना नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला, त्याप्रमाणे पालिकेतील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पुरावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दाखवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. ग्वालवंशी यांनी मीपणा लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे नमूद करीत आयुक्तांना टोला हाणला. रमेश पुणेकर यांनी नगरसेवकावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आयुक्तांनी माफी मागावी, अशी मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These three parties came forward to defend Commissioner Mundhe