पाऊण तासात चोरटा गजाआड, फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनमध्ये चोरी

योगेश बरवड
Thursday, 5 November 2020

मोहम्मद आसिफ मोहम्मद इकबाल (३२) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो मुंबईच्या ठाण्यातील रहिवासी आहे. तो  ०२१०१ मुंबइ-कोलकाता फेस्टिव्हल स्पेशल एक्स्प्रेसमधून रिसतर तिकीट घेऊन प्रवास करीत होता.

नागपूर  ः कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. यामुळे महामारीची भीतीही ओसरू लागली असून, रेल्वेगाड्यांमध्ये चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. बुधवारी एका चोरट्याने धावत्या प्रवासी रेल्वेतून प्रवाशाचे साहित्य पळवले. रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तरीत्या तपासचक्र जलदगतीने फिरवीत केवळ ४५ मिनिटांमध्ये चोरट्याला गजाआड केले. नागपूर रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही यंत्रणा तपासात उपयुक्त ठरली.

मोहम्मद आसिफ मोहम्मद इकबाल (३२) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो मुंबईच्या ठाण्यातील रहिवासी आहे. तो  ०२१०१ मुंबइ-कोलकाता फेस्टिव्हल स्पेशल एक्स्प्रेसमधून रिसतर तिकीट घेऊन प्रवास करीत होता. त्याच गाडीच्या ए-१ डब्याच्या बर्थ क्रमांक १४ वरून मीरा रोड, ठाण्याचा रहिवासी शशांक शेखर सिंह (२५) हा प्रवास करीत होता. 

ही गाडी बुधवारी सकाळी नऊ वाजता नागपूर स्टेशनकडे येत असताना चोरट्याने शशांकची बॅग चोरून नेली. नागपूर स्टेशनवर उतरायचे असल्याने शशांकने बॅग शोधण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ शोधाशोध करूनही बॅग न मिळाल्याने ती चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. नागपूर स्टेशनवर गाडी दाखल होताच शशांकने थेट आरपीएफ ठाणे गाठून तक्रार दिली. 

क्लिक करा - ट्रेनमध्ये भुकेने व्याकुळ झाले होते चार महिन्याचे बाळ; जवळचे दूधही होते खराब; अखेर आरपीएफने दाखवली तत्परता 
 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरटा संशयास्पदरीत्या बॅग घेऊन उतरताना व फलाट क्रमांक आठवरून स्टेशनबाहेर जाताना दिसला. चोरट्याचे छायाचित्र आरपीएफच्या व्हॉट्‍सॲप ग्रुपवर टाकण्यात आले. लागलीच गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक सचिन दलाल, भारत माने, उषा तिग्गा, कामसिंह ठाकूर, श्याम झाडोकार, लोहमार्ग पोलिस चंद्रशेखर मदनकर यांची टीम तयार करण्यात आली. 

खबऱ्यांनाही कामी लावण्यात आले. त्यातून संशयित व्यक्ती रेल्वेस्टेशन बाहेरील हॉटेलमध्येच असल्याचे समजले. लागलीच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून शशांकची बॅगही जप्त करण्यात आली. ही संपूर्ण शोध मोहीम केवळ ४५ मिनिटांमध्ये फत्ते करण्यात पथकाला यश आले. चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief was arrested in half an hour due to CCTV system