हो साहेबऽऽ चोरी केली आम्ही; मात्र, एकाही पैशाला हात लावला नाही; वाचा काय सांगतात चोरटे

The thieves told the story behind the theft
The thieves told the story behind the theft

नागपूर : उपाशी मुले. घरातील अन्नधान्य संपले. मुलांचे केवलवाने चेहरे पाहून दोघांनी एका महिण्याचा किराणा चोरण्याचा प्लॅन आखला. हातला काम मिळत नव्हते तर बेरोजगारीमुळे घरात खाण्याचे वांदे झाले होते. मजबुरी असल्याने दुसरा पर्याय नव्हता. मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनी वस्तीतील किराणा दुकान फोडले. घरात महिनाभर पुरेल एवढाच किराणा चोरला. काऊंटरमध्ये काही रक्कम पडलेली होती. मात्र, त्याला हातही न लावता चोरट्यांनी आपापले घर गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश धनराज येणूकर (वय २२) व नरेंद्र चिंतामण बोकडे (वय १९) दोघेही राहणार कुंदनलाल गुप्तानगर, वंजारी चौक, नागपूर अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांना अटक केली. चोरट्यांकडून १८ हजार ३२४ रुपयांचा किराणा माल जप्त केला. महेंद्र मोरेश्वर सदावर्ती (वय ४८, रा. तांडापेठ, चंद्रभागानगर, पाचपावली) यांचे यशोधरानगर हद्दीत कुंदनलाल गुप्तानगर येथे सनेश्वर ट्रेडर्स नावाने किराणा दुकान आहे.

पाच ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. सहा ऑक्टोबर सकाळी सात वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना कुंदनलाल गुप्तानगरमधील शाळेच्या पटांगणात दोन जण संशयास्पद बसलेले दिसले. त्यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता सनेश्‍वर ट्रेडर्समध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरून नेलेला किराणा माल जप्त केला. ही कारवाई परिमंडळ क्रमांक पाचचे पोलिस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे, डी.बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे यांच्या पथकाने केली.

घरात दोन दिवसांपासून जेवण शिजले नाही

खिशात रुपया नाही अन् कुणी उधार द्यायला तयार नाही. घरात दोन दिवसांपासून जेवण शिजले नाही. मुलांनी शेजाऱ्यांकडून आणलेले शिळे अन्न खाऊन दोन दिवस काढले. आता ते जेवणासाठी रडत होते. त्यांच दुख काही बघितले गेले नाही. मग दुसरा कोणताही विचार न करता फक्त महिनाभर पुरेल एवढाच किराणा चोरला. एकाही पैशाला हात लावला नाही. कारण, पैशे चोरी करायचेच नव्हते आम्हाला. मुले, बायको आणि घरातील परिस्थितीमुळे चोरी केल्याची कबुली दोन्ही चोरट्यांनी दिली.

काय गेले चोरी

चोरट्याने दुकानातून सोयाबीन तेलाचा पिपा, जिरा, संतूर साबण, साखर, मीठ, वाटिका शॅम्पू, धनीया पावडर, हळद पावडर, दाळ, शेंगदाणे, साबुदाना, मुलांसाठी बिस्किटचे पुडे, चॉकलेट आणि चिप्स, मसाला पावडर, रवा असा १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरी हा गुन्हाच

कुणी किती व काय चोरी केले याला महत्त्व नाही. चोरी हा गुन्हा आहे. त्यामुळे अन्न चोरी असो की किराणा चोरी करणे असो, तो गुन्हा आहे. तपासात दोन्ही चोर सापडले. दोघांनीही चोरीची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, असे यशोधरानगर पोलिसांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com