तब्बल आठ महिन्यांनंतर मोठा दिलासा; बाधितांपेक्षा कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

केवल जीवनतारे
Thursday, 22 October 2020

शहरात तब्बल ४ हजार २०३ बाधित घरी विलगीकरणात आहेत. नागपूर जिल्हयात असे एकूण ६ हजार ९२ रुग्ण आहेत. २२ दिवसापूर्वी जिल्ह्यात १५ हजार बाधित होते. यातील ६ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नागपूर : कोरोनाच्या विळख्यातून आठ महिन्यांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. बाधितांपेक्षा कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदरात काही प्रमाणात घट झाली आहे. बुधवारी ४२९ नवे बाधित आढळून आले तर २१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यत तीन हजार मृत्यूंची नोंद झाली आहेत. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ९१ हजार ९८८ वर पोहोचला. आज ४५७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या ८२ हजार ८९६ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्तीचा दर ९०.१२ टक्के एवढा आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये उपचारासाठी पाच हजारावर खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा वेग मंदावला आहे. यात मेडिकल, मेयो एम्ससह खासगी रुग्णालयांचा मोठा वाटा आहे. मेयो, मेडिकल, एम्ससह एकूण १०४ कोविड हॉस्पिटलमध्ये आता केवळ १ हजार ८८९ रुग्ण दाखल आहेत. यापैकी मेयो, मेडिकल आणि एम्स येथे साडेतीनशे बाधित दाखल आहेत. तर उर्वरित पंधराशेवर रुग्ण ग्रामीण रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

शहरात तब्बल ४ हजार २०३ बाधित घरी विलगीकरणात आहेत. नागपूर जिल्हयात असे एकूण ६ हजार ९२ रुग्ण आहेत. २२ दिवसापूर्वी जिल्ह्यात १५ हजार बाधित होते. यातील ६ हजार ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी शहरात २१ मृत्यू झाले असून यात शहरातील आठ आणि ग्रामीणमधील पाच असे एकूण १३ मृत्यू नागपूर जिल्ह्यातील आहेत. उर्वरित ८ रुग्ण बाहेरच्या जिल्ह्यातील होते. आजच्या ४२९ बाधितांमध्ये २९१ जण शहरातील तर १३० जण ग्रामीण भागातील आहेत. तर इतर जिल्ह्यातून रेफर करण्यात आलेल्या ८ जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

५ लाख ८० हजारांवर चाचण्या

नागपूर जिल्ह्यात प्रारंभी चाचणीचा टक्का कमी होता. ऑक्टोबर महिन्यात चाचण्यांची संख्या वाढल्यानंतर बाधितांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. ही बाब दिलासादायक आहे. बुधवारी जिल्ह्यात ६ हजार १६० चाचण्या झाल्या. यातील केवळ ४२९ जणांना बाधा झाल्याचे अहवालातून पुढे आले. ८ महिन्यांत नागपुरात ५ लाख ८० हजार ९३५ चाचण्या झाल्या आहेत. यातील ३ लाख १३ हजार ११७ आरटीपीसीआर चाचण्यात आहेत. उर्वरित २ लाख ६७ हजार ८१८ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या आहेत. चाचण्यांमध्ये एकूण ९१ हजार ९८८ जण बाधित आढळले.

असे आहेत कोरोनाचे मृत्यू

  • मेडिकल - १२६१
  • मेयो - १११५
  • एम्स - २०
  • खासगी रुग्णालय - ६१७
  • इतर जिल्ह्यातील - ३७३

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand deaths of corona victims in Nagpur district