आता बसं... खूप झाल हां... तू पुन्हा नको येऊ.... नाही होत सहन...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

येत्या चोवीस तासांत उत्तर-पश्‍चिम भारताच्या दिशेने सरकणार असल्याने पाच व सहा मार्चला विदर्भासह मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस अपेक्षित आहे. 

नागपूर : गेल्या आठवड्यात दोनवेळा वादळ व गारपिटीने तडाखा दिल्यानंतर विदर्भावर आणखी एक वादळी संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात तयार होऊ घातलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे आता बसं... खूप झाल हा... आता नाही होत सहन असच म्हणण्याची वेळ आली आहे. 

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, राजस्थान व आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेल्या "वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हा पट्टा येत्या चोवीस तासांत उत्तर-पश्‍चिम भारताच्या दिशेने सरकणार असल्याने पाच व सहा मार्चला विदर्भासह मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस अपेक्षित आहे.

कसं काय बुवा? - होळीच्या सणावर कोरोनाचे सावट

विशेषत: पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये वादळाचा "ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

मागचा इशारा ठरला फोल

मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने विदर्भात मागच्या शनिवारी व रविवारी "रेड' व "ऑरेंज अलर्ट'चा इशारा देत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला वादळी पावसाचा इशारा अपेक्षेप्रमाणे फोल ठरला. दिवसभर उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी वादळ आले. परंतु, काही भागांत हलका शिडकावा करून शांत झाले. 

धुनसी धास्ती

पुढील 48 तास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठे संकट घेऊन येण्याची दाट शक्‍यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले होते. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशाराही देण्यात आला होता. पावसाच्या शक्‍यतेमुळे वैदर्भींना उन्हाच्या चटक्‍यांपासून थोडाफार दिलासा मिळणार असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच स्थिती होती. मात्र, तसे काहीही झाले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunderstorms again Thursday and Friday in Vidarbha