चंद्रपुरातील जंगलातून पकडलेला वाघ नागपुरात क्वारंटाइन; हे आहे कारण... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

गोरेवाड्यात आणल्यानंतर वाघिणीच्या रक्त आणि विष्ठेचे नमुने घेतले आहे. त्याची तपासणीही करण्यात येत आहे. कालपासून वाघाने काही खाल्लेले नसले तरी तो आक्रमक आहे. माणसाचा वावर दिसताच तो आक्रमक होतो. 

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या शेजारच्या गावातील पाच व्यक्तींवर हल्ला करून जीव घेतल्याने बंदिस्त केलेल्या (केटी-1) वाघाला गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये 'क्वारंटाइन' केले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार, शहराबाहेरून आणलेल्या वन्यप्राण्यांनाही क्वारंटाइन केले जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सीझेडएच्या निर्देशानुसार, गोंदियाच्या वाघिणीपाठोपाठ आता चंद्रपूरच्या वाघालाही क्वारंटाइन केले आहे. ही राज्यातील वाघाची दुसरी घटना आहे. 

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील 'ब्रॉंक्‍स झू'मधील वाघाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशातील सर्वच प्राणिसंग्रहालयाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, अंमलबजावणी केली जात असून, गोरेवाड्यात आणल्यानंतर वाघिणीच्या रक्त आणि विष्ठेचे नमुने घेतले आहे. त्याची तपासणीही करण्यात येत आहे. कालपासून वाघाने काही खाल्लेले नसले तरी तो आक्रमक आहे. माणसाचा वावर दिसताच तो आक्रमक होतो. 

हेही वाचा : अस्वलीने शिकाऱ्यांना ठार मारून घेतला बदला

वाघावार सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह प्रत्यक्ष त्यांच्या वर्तनावर 24 तास लक्ष ठेवले जात आहे. प्राण्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. प्राण्यांना खाऊ घालताना कर्मचाऱ्यांचा कमीत कमी संपर्क येईल, अशी काळजी घ्यावी. आजारी प्राण्यांचे तातडीने विलगीकरण करावे, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. डॉ. शिरीष उपाध्ये, विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर देखरेख ठेवली जात आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger Quarantine at Nagpur