Sad Story : मुलांनी हाकलले, परक्यांनी स्वीकारले; ७५ वर्षांच्या गुरनुलेंवर भीक मागण्याची वेळ

Time to beg on 75 year old Gurnule
Time to beg on 75 year old Gurnule

नागपूर : घरात वंशाचा दिवा आला की मायबाप खूष होऊन पेढे वाटतात. आयुष्यभर अतोनात कष्ट करून मुलांना लहानाचे मोठे केल्यानंतर त्यांनाही मुलांकडून म्हातारपणी आधाराची माफक अपेक्षा असते. मात्र, ७५ वर्षीय शंकर गुरनुले याबाबतीत कमनशिबी ठरले. दोन मुलं आणि मुलगी असूनही या दुर्दैवी बापावर रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यांची अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्तीने आपल्या आश्रमात आश्रय देऊन माणुसकीचा परिचय दिला.

शंकर यांच्या पत्नीच्या निधनानंतर दोन्ही मुलांनी वडिलांना वाऱ्यावर सोडून दिले. मुलगी सासरी असल्यामुळे तीदेखील आपल्या जन्मदात्याला जवळ करू शकली नाही. नाइलाजाने पोट भरण्यासाठी शंकर यांच्यावर रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली. जवळपास सात वर्षांपासून ते रस्त्यावर भीक मागून व मिळेल तिथे रात्र काढून आयुष्य जगत आहेत.

तीन-चार दिवसांपूर्वी वर्धा येथील सरकारी हॉस्पिटलच्या गेटसमोर ते भीक मागत असताना रोठा (जि. वर्धा) येथील मंगेशी मून यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. शंकर यांच्या शरीराला माशा लागल्या होत्या, तोंडातून लाळ गळत होती. अंगात अजिबात ताकद नव्हती. कुठेतरी पडल्याने चेहऱ्यावर सर्वत्र जखमा होत्या. त्याही अवस्थेत ‘भूक लागली, खायला द्या’ असा एकच आर्जव ते करीत होते.

त्यांचे हाल पाहून मंगेशी यांनी त्यांना खाऊपिऊ घातले, पाणी पाजले आणि शंकर यांना आपल्या आश्रमात घेऊन आल्या. आश्रमातील कर्मचारी व चिमुकल्यांनी त्यांची स्वच्छ अंघोळ करून नवे कपडे दिले. शंकर आता आश्रमातील फळबाग व शेतीच्या कामात रमले असून येथेच त्यांनी आपले उर्वरित आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतर आले वाईट दिवस

वर्धा जिल्ह्यातील वणी (वरुड) गावचे रहिवासी असलेले शंकर कधीकाळी आपल्या परिवारात खूष होते. स्वतःचं घर होतं, बायको होती; मुलं होती. दिवसभर उन्हातान्हात मिस्त्री काम करून त्यांनी तिन्ही मुलांचा सांभाळ केला. त्यांना लहानाचे मोठे केले, लग्न लावून दिले. शंकर यांचा एक मुलगा सेवाग्राममध्ये, तर दुसरा नागपुरात राहतो. मुलगी लग्न होऊन सासरी गेली. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक एकेदिवशी पत्नी सोडून गेली आणि शंकर यांचे वाईट दिवस सुरू झाले.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद
शंकर काकांची अवस्था पाहून मला राहवले नाही. त्यांना आधाराची गरज होती म्हणूनच मी त्यांना आश्रमात घेऊन आले. इथे ते शेती व फळबागेतील छोटीमोठी कामे करतात. खूष आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी समाधान आहे. 
- मंगेशी मून,
संस्थापक, उमेद संकल्प संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com