उपचाराविना गरिबांवर येणार अंधत्वाची वेळ; वाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

The time of blindness will come upon the poor without treatment medical hospital news
The time of blindness will come upon the poor without treatment medical hospital news

नागपूर : मुंबईतील जे जे रुग्णालय सोडल्यास राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ‘सजिर्कल रेटिना’चे डॉक्टर उपलब्ध झाले होते. यासाठी २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. मात्र, तत्कालीन शासनाच्या कंत्राटीकरणाच्या धोरणाने घात केला. नुकतेच रेटिनावर उपचार करणारे कंत्राटीवर असलेले रेटिनातज्ज्ञ सोडून गेले. यामुळे गरिबांच्या रेटिनावरील उपचार थांबले आहेत. या रुग्णांना आता मुंबईच्या जे जे किंवा दिल्लीच्या एम्समध्ये रेफर करण्यात येते. विशेष असे की, रेटिनावरील उपचाराचा खर्च न झेपणारा आहे. यामुळे विदर्भातील गरीब रुग्ण तेथे जात नाही. प्रसंगी उपचाराविना अंधत्व पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

नागपूर मेडिकलमध्ये २४ वर्षांनंतर नेत्ररोग विभागाला डॉ. सौरभ अग्रवालसह दोन ‘रेटिनल सर्जन’ उपलब्ध झाले होते. कंत्राटीवर असल्याने ते दोघेही सोडून केले. यानंतर डॉ. वंदना अय्यर यांची नियुक्ती झाली. त्यांनादेखील कंत्राटीवर घेण्यात आले. २०१६ पासून या विभागात दर दिवसाला रेटिनच्या आजाराच्या २५ ते ३० रुग्णांवर उपचार व्हायचे.

विदर्भात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मोतीबिंदू, काचबिंदू हे आजार तर होऊ शकतातच, पण मुख्यत्वे मधुमेहामुळे दृष्टिपटलावरील (रेटिना) रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’वरील उपचारही मेडिकलमध्ये उपलब्ध होते. कंत्राटीवर असलेल्या डॉ. वंदना अय्यर यांना स्थायी स्वरूपात चेन्नई येथे रेटिनातज्ज्ञ म्हणून नोकरी लागली आणि त्यांनी कंत्राटी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, मेडिकल प्रशासनाने रेटिनावरील उपचारासाठी आवश्यक कोट्यवधीची उपकरणे खरेदी केली.

ओटीसी, लेझर, व्हिट्रेक्ट्रॉमीसह इतरही यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र, तज्ज्ञ नसल्याने ही उपकरणे आता शोभेची वस्तू बनण्याची दाट शक्यता आहे. रेटिना सर्जनची प्रतीक्षा आता कधी संपेल हे मात्र कळायला मार्ग नाही. रेटिनाचे डॉक्टर नसल्याने आता डोळ्यांची अँजिओग्राफी, सीटी स्कॅन, डोळ्यांच्या आतील रक्ताचा गोळा साफ करणे, डोळ्यांच्या आत इंजेक्शन देऊन रेटिनाचा रक्ताचा प्रवाह वाढविण्यासह जागेवरून सरकलेल्या दृष्टिपटलावर (रेटिनल डिटॅचमेंट) होणारे उपचार थांबले आहेत. 

मेडिकलमध्ये २५ वर्षांपूर्वी

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात २५ वर्षांपूर्वी तत्कालीन विभागप्रमुख डॉ. माला कांबळे असताना रेटिनाशी संबंधित रुग्णांवर उपचार होत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, डॉ. कांबळे निवृत्त झाल्यानंतर हे उपचार थांबले होते. तेव्हापासून गरीब रुग्णांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटल, दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल किंवा हैदराबाद किंवा चेन्नई येथील विश्वस्त संस्थेच्या नेत्र रुग्णालयात रेफर केले जात होते.

येणे-जाणे व तिथे राहून उपचार घेण्याची आर्थिक स्थिती नसल्याने अनेक रुग्णांना अंधत्व पत्करावे लागत होते. हीच बाब लक्षात घेत नुकतेच निवृत्त झालेले नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या सहकार्यातून नेत्ररोग विभागात पुन्हा रेटिनावरील उपचार सुरू झाले. मात्र, भाजप काळातील कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे रेटिनातज्ज्ञ सोडून गेले. या विभागातील रेटिना उपचार विभागावर अवकळा येण्याची भीती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com