मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

अनिल कांबळे
Saturday, 4 July 2020

आता गेल्या एक महिन्यापासून गंगाजमुना वस्तीत राहणाऱ्या वारांगनांकडे प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गंगाजमुनात ना भात वाटल्या जात ना धान्य. त्यामुळे आता पोटाला चिमटा काढून जगण्याचेही दिवस गेले. कोरोनासारख्या महामारीचा सामाना करून तेथील वारांगना चोरून-लपून शरीर विकतात.

नागपूर : कोरोनामुळे लॉकडाउन होतं तेव्हा काही समाजसेवक धान्य पुरवित होते... काही ओळखीच्या नागरिकांनीही मले बरीच मदत केली... आता लॉकडाउन हळूहळू कमी झाले... आता लोकही मदत करीत नाही... कोरोनाच्या भीतीपोटी गंगाजमूना काही सुरू झाला नाही... त्यामुळे आपली हवस भागविण्यासाठी कुणी इथे येत नाही. तरी लपून-छुपून आपलं शरीर विकते... शरीर विकून दोन पैसे कमावते... सायंकाळी त्याच पैशातून आटा आणि भाजी आणते... पोलिसवाले म्हणते धंदा करू नको... कोरोना होईल... आता धंदा नाही केला की उपाशी मरा लागन... म्हणून चोरून-लपून का होईना... मी करते धंदा... आणि करीत राहील... जे होईल ते होईल माया जिवाचं... अशी व्यथा गंगाजमुनातील चमेली नावाच्या वारांगणेने दै. "सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्‍त केली. 

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन आणि संचारबंदी असल्यामुळे राज्यातील दुसऱ्या क्रमांकावरील मोठी वेश्‍यावस्ती म्हणून ओळख असलेली गंगाजमुना वस्ती बंद झाली. सुरुवातीचे दोन आठवडे जवळचे पैसे खर्च करून वारांगनांनी कसेबसे निभावले. त्यानंतर त्यांची फरपट सुरू झाली. त्यांच्यापुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्‍न असल्याने वस्तीत काम करणाऱ्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धान्य किट वाटल्या तर मसाला भातही वाटला.

जाणून घ्या - मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे? 

आता गेल्या एक महिन्यापासून गंगाजमुना वस्तीत राहणाऱ्या वारांगनांकडे प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गंगाजमुनात ना भात वाटल्या जात ना धान्य. त्यामुळे आता पोटाला चिमटा काढून जगण्याचेही दिवस गेले. कोरोनासारख्या महामारीचा सामाना करून तेथील वारांगना चोरून-लपून शरीर विकतात. पूर्वीप्रमाणे बाजार नाही. परंतु, काही वारांगना पैसे कमविण्यासाठी नव्हे तर दोन वेळेसचे जेवण करण्यासाठी देहव्यापार करतात. 

प्रशासनाने घालावे लक्ष

मनपा आणि जिल्हा प्रशासनाने वारांगनांच्या आरोग्यासह उपजीविकेसाठी अन्य पर्याय उपलब्ध करून देण्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच सामाजिक संघटनांनीही मदतीचा हात द्यावा. अन्यथा कोरोना सारख्या महामारीच्या संकट काळातही वारांगना केवळ पोट भरण्यासाठी देहव्यापार करतील. गंगाजमुनामुळे अन्य वस्तीतही कोरोना पसरण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - एकेकाला ड्युटीवरून हाकलून देईन; मला समजता काय, अशी धमकी देणारा 'तो' आहे तरी कोण, वाचा...

शरीर विकाण्याशिवाय पर्याय नाही

मी सुजाता... वय 33 वर्षे... तीन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन लागल्याने अनेक जणी आपापल्या गावी परतल्या... पण मले तर माय-बापच नाहीत... 15 वर्षांची होती... नातेवाईकांनीच माझ्या शरीराचे लचके तोडले... अन्‌ गंगाजमुनात विकलं... तेव्हापासून गंगाजमूनाच माझे घर आणि दारं... सुरुवातील अनेक जणांनी धान्यकिट आणि मसाला भात दिला... परंतु, आता सर्व काही बंद झालं... पदरचे पैसे संपले... जगण्यासाठी शरीर विकाण्याशिवाय पर्याय नाही, अस दुर्गा म्हणाली. 

मी बाहेर जाऊन धंदा करते

लॉकडाउनमुळे ग्राहक येत नाही. त्यामुळे पैसे कमवता येत नाही. पोलिसांची नजर राहते गंगाजमुनावर. दुसरं काम करतो म्हटल तर जमत नाही. सुरुवातीपासून ह्याच व्यवसायात आहे ना... बोलणं-चालण पण अलगच. त्यामुळे लोकांना पटकन समजते... वारांगना आहे... त्यामुळे घरी कामही देत नाही. म्हणून काही ओळखीच्या नंबरवर फोन करून कमी पैशांमध्ये शरीर विकते. पैसे कमवण्यासाठी नव्हे तर दोन वेळच्या जेवण्यासाठी असे काम करीत आहे. ही माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर वारांगनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The time of famine on the prostitute in the Ganga Jamuna in Nagpur