मोठी बातमी: पशुसंवर्धन आयुक्त घेणार महत्वाचा निर्णय; राज्यात पशु चिकित्सालयाच्या वेळेत बदल होण्याची चिन्हे

विनोद इंगोले 
Thursday, 3 September 2020

राज्यभरात पशूपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. संघटनेच्या मतानुसार,  पशुपालन पूर्वी सकाळी जनावरांना चरायला घेऊन जात होते.

नागपूर  : पशुपालन पद्धतीत काळानुरूप झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत आहे. त्याची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यभरातून या विषयावर अभिप्राय मागविले आहेत. त्याआधारे वेळेत बदलाचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. 

राज्यभरात पशूपालन पद्धतीत बदल होत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने नोंदविले आहे. संघटनेच्या मतानुसार,  पशुपालन पूर्वी सकाळी जनावरांना चरायला घेऊन जात होते. त्यादरम्यान ते आपल्या जनावरांना गरज भासल्यास पशुचिकित्सालयात उपचारासाठी देखील आणत होते. मात्र काळानुरूप पशुपालन पद्धतीत बदल अनुभवला जात आहे.

क्लिक करा - खबरदार ! विनाकारण त्रास द्याल तर, गाठ माझ्याशी आहे, कोण म्हणाले असे?

आता सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास पशूपालक गाव, शहरात किंवा संकलन केंद्रावर दूध घालायला जातात. सकाळी दूध घालून परतल्यावर तसेच संध्याकाळी दुध घालायला जाण्यापूर्वी त्यांच्याकडे वेळ असतो. या दरम्यान ते आपल्या जनावरांना उपचारासाठी पशुचिकित्सालयात आणू शकतात. 

त्यामुळे पशुचिकित्सालय वेळेत बदल करण्याची मागणी आहे. या संदर्भाने महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुसंवर्धन सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे पाठपुरावा चालविला आहे. संघटनेच्या या मागणीची दखल घेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून याप्रश्‍नी अभिप्राय मागितले आहेत. गाव स्तरावरून पशुपालकांची मागणीदेखील विचारात घेतली जाणार आहे.  त्यानंतरच या संदर्भाने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. 

पशुचिकित्सालयांची स्थिती

एकूण राज्य -  4847
जिल्हास्तर - 33
जिल्हा परिषदकडे - 4177
राज्य सरकारकडे - 670

अशा आहेत वेळा

फेब्रुवारी ते सप्टेंबर : 
- सकाळी सात ते बारा व 
- दुपारी चार ते संध्याकाळी सहा 
- शनिवारी सकाळी 7 ते दुपारी बारा. 

- ऑक्‍टोबर ते जानेवारी
- सकाळी आठ ते एक 
- दुपारी तीन ते पाच 
- शनिवारी सकाळी 8 ते दुपारी एक

असा आहे प्रस्तावित बदल

- सकाळी नऊ ते दुपारी 4. 
- शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1

"राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने पशुपालकांचा आग्रह असल्याचे सांगत पशुचिकित्सालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश पशुचिकित्सालय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहेत.  त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून या पार्श्वभूमीवर अभिप्राय मागविण्यात आले आहेत. पशुपालकांची मागणी देखील विचारात  घेतली जाईल.  त्यानंतर वेळेत बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल." 
- सचिंद्र प्रताप सिंह 
पशुसंवर्धन आयुक्त, पुणे. 

हेही वाचा - अरे व्वा... भारतीय श्वानांना मिळणार हक्काचे घर; पण कसे काय, वाचा सविस्तर

"पशुपालनाच्या पद्धतीत बदल झाल्याने पशु चिकित्सालय आच्या वेळेत बदलाची मागणी आहे त्याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे" 
- रामदास गाडे,
अध्यक्ष,  
महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Timings of Veterinary clinics may change in state