ट्रकच्या कॅबिनमध्ये युवतीवर बलात्कार; युवकाविरुद्ध गुन्हा

अनिल कांबळे
Tuesday, 3 November 2020

ऑक्टोबर २०१७ ला तिला सायंकाळी भेटायला बोलावले. तिला जरीपटक्यातील पाटनकर चौकात उभ्या असलेल्या ट्रकजवळ नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे गोलूने तिला बळजबरीने ट्रकच्या कॅबिनमध्ये ढकलले. त्यानंतर कॅबिनमध्येच रियावर बलात्कार केला.

नागपूर : ‘सिक्रेट’ सांगण्याचा बहाणा करीत मैत्रिणीला ट्रकच्या कॅबिनमध्ये कोंबून युवकाने बलात्कार केला. ही घटना जरीपटका परीसरात उघडकीस आली. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अटक केली आहे. गोलू सिंग उर्फ गुरूप्रीतसिंह गिडल (२५, रा. जरीपटका) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही आई-वडिलांसह जरीपटक्यात राहते. तिच्या वस्तीत आरोपी गोलू सिंग राहतो. त्याने रियाच्या मैत्रिणाच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर तिच्याशी फोनवर बोलने सुरू केले. तिच्याशी मैत्री केली. काही दिवसातच त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांच्या भेटी वाढल्या आणि तिचाही गोलूवर जीव जडला.

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

ऑक्टोबर २०१७ ला तिला सायंकाळी भेटायला बोलावले. तिला जरीपटक्यातील पाटनकर चौकात उभ्या असलेल्या ट्रकजवळ नेले. तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे गोलूने तिला बळजबरीने ट्रकच्या कॅबिनमध्ये ढकलले. त्यानंतर कॅबिनमध्येच रियावर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवस्थेत रियाने तेथून पळ काढला आणि घर गाठले.

काही दिवस तिने स्वतःला घरात एकाकी करून घेतले. त्यानंतर गोलूने तिला फोन करून घरी भेटायला येत असल्याचे सांगितले. कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने तिने कुणालाही सांगितले नाही. तो भेटायला घरी आला आणि त्याने पुन्हा बलात्कार केला. याप्रकरणी रियाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती जरीपटका पोलिसांनी दिली.

अधिक वाचा - कांदा, बटाटा तडकला; लाभ व्यापाऱ्यांना; शेतकऱ्यांचे माप रितेच

लग्न करण्याचे आमिष

गोलू सिंग हा रियाला वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापिक करण्यासाठी बाध्य करीत होता. त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. लग्न करणार असल्यामुळे तिने नातेवाईकांना गोलूबाबत सांगितले. लग्नाचे आमिष देऊन तो तीन वर्षांपासून लैंगिक शोषण करीत होता. त्याने नातेवाईक असलेल्या मुलीशी प्रेमसंबंध असून तिच्याशी लग्न करणार असल्याचे रियाला सांगितले. त्यामुळे रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Torture of a young girl in the cabin of a truck