"शेती करनं सोडा लागते जी सायेब... कायी उपाय नाई . किडीनं खाल्ला कापूस"; विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा 

चंद्रशेखर महाजन 
Friday, 5 February 2021

गेल्या वर्षी कापूस चांगला झाला. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यावर्षी उलटेच झाले. कपाशीवर विविध रोग आल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन ४५ टक्‍क्यांनी घटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागपूर : ः सायेब कोरोना माणसांवरच नाही आला जी, तो पिकावरही आला. कपाशीच्या भरवशावर पोटापाण्याचा ईचार केला. गेलं सायेब सगळं पीक गेलं. ७५ क्विंटल कपाशी १७ वर आली. खर्च तर भरपूर आला. सायेब तुम्हीच सांगा पोट कसे भराचे. शेती करनं सोडावं लागते जी. कायी उपाय नाई सायेब. यावर्षी सर्वच गेलं. हे शब्द आहेत खापरी येथील शेतकरी केशव सोनटक्के यांचे. शेतात कपाशीचे पीक घेतले मात्र, त्यातून गेल्यावर्षीपेक्षा ७० टक्के उत्पादन कमी झाल्याने त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी कापूस चांगला झाला. त्यामुळे यावर्षीही शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र यावर्षी उलटेच झाले. कपाशीवर विविध रोग आल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन ४५ टक्‍क्यांनी घटल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या असता त्यांनी त्याला दुजोरा तर दिला. उत्पादन खर्चही निघेल की नाही, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. नागपूर ग्रामीण तालुक्यातील खापरी रेल्वे येथील शेतकरी केशव सोनटक्के यांच्याकडे कांढळी येथे १० एकर शेती आहे. त्यात ते कपाशी लावतात. 

नक्की वाचा - एका दणक्यात अख्खा दरवाजा तोडणारा 'दया' आता देणार वाहतूक नियम पाळण्याचा...

गेल्या अनेक वर्षांपासून नित्यउपक्रमाने ते पीक घेतात. यावर्षी पावसाने आणि त्यानंतर कपाशीवर आलेल्या किडीने दगा दिला. थेट बोंडावरच किडीने हल्ला केल्याने कापसाचा धागाही निघणे मुश्कील झाल्याचे त्यांनी सांगितले. १० एकराला दीड लाखांवर खर्च झाला. यावर्षी तो खर्चही निघणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी ७५ क्विंटल कापूस झाला. यावर्षी फक्त १७ क्विंटल कापूस झाला. ७० टक्के उत्पादनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतीवर झालेला हा एकप्रकारे हल्लाच आहे, असेही ते केशव सोनटक्के म्हणाले.

बोंडसड आणि गुलाबी बोंडअळीने केला घात

विदर्भातील कपाशीवर सुरुवातीपासूनच किडीने हल्ला केला. कपाशी वाऱ्याला लागल्यानंतर बोंड तयार होताना गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड रोगाने हल्ला केला. या दोन्ही आक्रमणातून कपाशीला वाचविताना दमछाक झाली. मात्र, शेतकऱ्यांना यश मिळाले नाही. खर्च झाल्यानंतरही काही हाती न लागल्याने शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले.

रोगामुळे झालेले सरासरी नुकसान (विभागनिहाय टक्केवारी)

नागपूर - ४५
अमरावती -४२
औरंगाबाद-३७
लातूर- ३९
पुणे-२७
कोल्हापूर-२२
नाशिक-२४

गेल्या वर्षी कपाशी चांगली झाली. यावर्षी मोठे नुकसान झाले. सरकार मदत करेल अशी अपेक्षा होती. मात्र, यावर कोणीही बोलताना दिसत नाही.सरकारने शेतकऱ्यांनी मदत जाहीर करावी, जेणेकरून शेतकरी पुन्हा शेती करण्यासाठी पुढे येईल.
केशव सोनटक्के, 
खापरी रेल्वे.

हेही वाचा - गर्भपात लपवण्यासाठी 'तिनं' स्वतःच रचलं षड्‌यंत्र; पोलिसांच्या चौकशीत समोर आला धक्कादायक...

यावर्षी कापसाचे मोठी हानी झाली आहे. गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाला आणि सरकारने वेळेत पैसे दिल्याने त्याला शेती करताना त्रास झाला नाही. मात्र यावर्षी शेतकरी पुरता कोलमडला आहे. त्याला मदत मिळणे आवश्यक आहे.
हुकूमचंद आमधरे, 
संचालक(सभापती), मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 45 percent lose of cotton in vidarbha region