तुकाराम मुंढे यांनी ठणकावले...मनमानी कराल तर फौजदारी कारवाई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने आज बांगलादेश, नाईक तलाव परिसरात दौरा करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले

नागपूर : कोरोनापासून बचावासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. परंतु, याचे पालन न करणे, खबरदारी न घेणे, बेजबाबदारपणाचे वर्तन यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलतेचा अर्थ स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्‍यात घालणे नव्हे, अशा शब्दात आयुक्तांनी नागरिकांचेही कान टोचले.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

चारचाकी वाहनात वन प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एका व्यक्तीलाच परवानगी असताना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आवश्‍यकता नसतानाही घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली आहे. ही धोक्‍याची घंटा आहे. या शहराला सुरक्षित ठेवायचे असेल, तर नागरिकांनी नियम पाळायलाच हवे.

नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये. प्रशासनाला साथ दिल्यास कोरोनाची साखळी खंडित करणे शक्‍य आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाची साखळी खंडित न केल्यास दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण वाढतील. मृत्यूसंख्याही वाढेल. पण, नियमाचे पालन केल्यास या अप्रिय घटना टाळणे शक्‍य आहे, असेही ते म्हणाले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

"मिशन बिगीन अगेन'अंतर्गत राज्य सरकारच्या निर्देशानुसार, शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली. शिथिलता देतानाच कोरोनाबाबतचे नियम पाळण्याची जबाबदारीही आहे. परंतु, नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. नियमाचे पालन न केल्यास कोरोनाचा मोठा उद्रेक होईल, असा इशारा देतानाच आयुक्तांनी मनमानीवरून नागरिकांना ठणकावले. फौजदारी कारवाईस बाध्य करू नका, असाही इशारा त्यांनी दिला. 

अधिकाऱ्यांचा नाईक तलाव, बांगलादेशमध्ये दौरा 
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने आज बांगलादेश, नाईक तलाव परिसरात दौरा करून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी माने, डॉ. वसुंधरा भोयर यांनी नागरिकांशी संवाद साधला. विलगीकरणास विरोध करू नका, लक्षणे लपवू नका, विशेष म्हणजे घाबरू नका, असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले. 

लक्षणे आढळल्यास करा फोन 
नियमित मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुणे या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आढळल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षातील 0712-2567021 आणि 0712-2551866 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही या अधिकाऱ्यांनी केले. अधिकाऱ्यांनी येथील भयग्रस्त नागरिकांना धीर देतानात स्वत:मुळे इतर कुणीही बाधित होऊ नये यासाठी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहनही केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Mudhe warn people to follow the rules