Video : तुकाराम मुंढे देत होते शिस्तीचे अन् मध्येच एकाचा मोबाईल खणखणला... नंतर झाली ही कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

या कार्यालयामध्ये तुम्हाला जी खुर्ची मिळाली आहे, त्यामुळेच समाजात तुमचे स्टेटस आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाशी किती प्रामाणिक राहायला पाहिजे, हे तुम्हालाच कळायला हवे. लहान-सहान चुका असतील तर त्या दुरुस्त करता येतील. पण गंभीर चुका, वारंवार केल्या जाणाऱ्या चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत.

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज शिवजयंती सोहळ्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्‍लास घेतला. कार्यालयात जीन्स घालून येऊ नये, हे आयुक्तांनी सुरुवातीलाच सांगितले होते. तरीही आजच्या कार्यक्रमात एक कर्मचारी जिन्स घालून आला. त्यामुळे "माझ्याकडेही भरपूर जीन्स आणि टी शर्ट आहेत', असे सुनावत "आज सांगतो, यापुढे वॉर्नींग देणार नाही', असे त्या कर्मचाऱ्याला सुनावले. याच वेळी एका कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन वाजला, तो लगेच मुंढेंनी जप्त केला.

 

ऑफिस वेअर काय आहे, हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. त्यामुळे कार्यालयात येताना नेहमी साधे कपडे घालावे. दररोज दाढी करा. जर तुम्ही ही सुधारणा केली नाही, तर मग गणवेश सक्तीचा करायचा का, असा प्रश्‍न मुंढेंनी कर्मचाऱ्यांना विचारला.

मुंढे म्हणाले, या कार्यालयामध्ये तुम्हाला जी खुर्ची मिळाली आहे, त्यामुळेच समाजात तुमचे स्टेटस आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाशी किती प्रामाणिक राहायला पाहिजे, हे तुम्हालाच कळायला हवे. लहान-सहान चुका असतील तर त्या दुरुस्त करता येतील. पण गंभीर चुका, वारंवार केल्या जाणाऱ्या चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत.

हेच महाराजांचे खरे मावळे... बाईक रॅली थांबवून रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट

माझ्याकडेही जीन्स, टी शर्ट आहेत
लक्षात ठेवा, चुकीची पुनरावृत्ती खपवून घेतली जाणार नाही. आढावा घेत असताना लक्षात आले की, एक कर्मचारी 90 दिवस गैरहजर होता. तरीही त्याचे वेतन काढले गेले. आता असे होता कामा नये, म्हणजे होणारच नाही. सातवा नाही दहावा वेतन आयोग घ्या, पण त्या दर्जाच कामही करा. दायीत्व स्विकारण्याचे मूल्य जोपर्यंत तुमच्यात रुजणार नाही, तोपर्यंत संस्था म्हणून आपण पुढे जाणार नाही. 

नशीबाने दिली साथ आणि प्रशांत झाला कोट्यधीश 
 

आपल्याकडे शिस्तीच्या बाबतीत कुणीही गंभीर नाही. आपला कायदा वाचा, म्हणजे शिस्त आपोआपच येईल. 10 वाजता येऊन 6 वाजता घरी जाणे, फक्त एवढेच करू नका. असे कराल तर माणूस आणि जनावर यात काहीच फरक नाही, असे समजा. माणूस आहात, कामात बुद्धीचा वापर करा. 10 दिशांना 10 तोंड, अशी आपली आजची स्थिती आहे. ती बदलावी लागेल. टीम म्हणून काम करा, रिजल्ट ओरीएंटेड काम करा, असे तुकाराम मुंढे यांनी कार्यालयातील कर्मचा-यांना खडसावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe deciplinary action on nmc employee