15 वर्षांत तेरापेक्षा जास्त बदल्या, तडफदार तुकाराम मुंढे आता नागपूर महापालिकेत

Tukaram mundhe
Tukaram mundhe

नागपूर : ध्येयवेडे व धडाडीने काम करणारे आयुक्त अशी राज्यभर ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांची आज नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. ते याच आठवड्यात महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अफवांना आज पूर्णविराम मिळाला. मात्र, सत्ताधाऱ्यांना झुगारत धडक निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यप्रणालीमुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांत धडकी भरल्याचेही चित्र आहे.
 

गेल्या पंधरा दिवसांपासून तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत येणार असल्याची चर्चा मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांत सुरू होती. काहींनी ही अफवा असल्याचेही सांगितले. परंतु, आज सायंकाळी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालकपदावरून तुकाराम मुंढे यांच्या नागपूर महापालिका आयुक्तपदी बदलीचे आदेश काढले. मुंढे 2005 मधील बॅचचे आयएएस आहेत.


पदाधिकाऱ्यांत धडकी, अफवांवर पूर्णविराम
सध्याचा पदाचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवून नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असेही मुंढे यांच्या बदली आदेशात नमूद आहे. त्यामुळे याच आठवड्यात मुंढे नागपूर महापालिका आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळतील, असे संकेत मिळत आहे. आज सायंकाळी नागपूर महापालिकेतही त्यांच्या बदलीचे पत्र पोहोचले. प्रामाणिकपणा व धडाडीच्या कार्यप्रणालीमुळे ते काही शहरांत लोकप्रिय झाले असले तरी त्यांना सत्ताधाऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला.

आयुक्त बांगर यांच्या अचानक बदलीने सारेच आश्‍चर्यात
नागपूर महापालिकेतील अधिकारी व पदाधिकारीही त्यांच्या कार्यप्रणालीपासून अनभिज्ञ नाही. त्यामुळे नागपूर महापालिकेत त्यांच्याशी समन्वयाने काम करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे राहणार आहे. जनहिताचे धडक निर्णय घेण्यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यासाठी ते कधीच सत्ताधारी किंवा नेत्यांची गय करीत नसल्याचेही त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतून दिसून आले. त्यामुळेच नवी मुंबई असो की नाशिक, येथे त्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली होती.


35 दिवसांत बदली
त्यांच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत तेरापेक्षा जास्त बदल्या झाल्या. सध्या ते राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी आहेत. या पदावर येण्यापूर्वी ते मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव होते. येथून त्यांची बदली 35 दिवसांत झाली होती. तत्पूर्वी नाशिक महापालिकेतून त्यांची 9 महिन्यांत मुंबईत मंत्रालयात बदली करण्यात आली होती.

पुन्हा नागपुरात
2008 साली नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. कार्यभार स्वीकारताच त्यांनी पहिल्याच दिवशी काही शाळांना भेट दिली. यावेळी गैरहजर आढळून आलेल्या शिक्षकांना त्यांनी तत्काळ निलंबित केले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्‍टरांना निलंबित केले. इतिहासात पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने डॉक्‍टरला निलंबित केले होते. यावरून त्यांच्यात व सत्ताधाऱ्यांत संघर्ष पेटला. त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com