प्रतिकार शक्‍ती वाढविणारी हळद आणि पिंपळी देतील कोरोनाशी लढा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपचारातून नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनो विषाणूला आळा घालण्याबाबत बऱ्याच सकारात्मक सूचना केल्या आहेत. विशेष असे की, आयुर्वेदाचे महत्व वाढत आहे

नागपूर : पोट, यकृत आणि प्लाझ्मा ही मानवी शरीरातील शक्तीस्थळं आहेत. या शक्तीस्थळांना सक्षम करण्यासाठी औषधीय गुणधर्म असलेल्या हळद आणि पिंपळीचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचे बळ मिळते. अशा विषांणूचे आक्रमण थोपवण्यासाठी लस घेण्यापेक्षा आपले शरीर सक्षम करूया आणि कोरोनासारखे विषाणू दूर ठेवू या, अशी भावना अमेरिकेतील न्यू मेक्‍सिको विद्यापीठात डॉक्‍टरांना आयुर्वेदशास्त्राचे धडे देणारे आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुनील जोशी यांनी व्यक्त केली.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक उपचारातून नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढवून कोरोनो विषाणूला आळा घालण्याबाबत बऱ्याच सकारात्मक सूचना केल्या आहेत. विशेष असे की, आयुर्वेदाचे महत्व वाढत आहे. आयुर्वेदशास्त्राशी संबधित जीवनशैलीचा वापर विदेशात होऊ लागला असल्याचे डॉ. जोशी म्हणाले. पाश्‍चिमात्य जीवशैलीमुळेच विदेशात कोरोनामुळे अधिक नुकसान झाल्याचे ते म्हणाले. विषाणू पोटावाटे शरीरात प्रवेश करतात. शरीराचे अग्नि असलेले पोट, तसेच शरीरात आईचं काम करणार यकृत हे सक्षम असल्यास कोणताही विषाणू आघात करू शकत नाही. प्लाझ्मा हा रसधातू. या प्लाझ्माद्वारे विषाणू रक्तात, फुफ्फुसात पसरतात. शरीरातील पोट, यकृत आणि प्लाझा यांचं काम बिघडू नये. यासाठी आपली जीवनशैली सुधारण्यावर भर द्यावा. धुम्रपान, मद्यपान, अधिक मांसाहार टाळावा. पचनासाठी सुलभ आहार असावा. प्राणायाम आणि व्यायाम करावा. जेणेकरून कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचं बळ शरीरातच तयार होईल. प्रतिबंध हाच खरा उपाय असल्याचे प्राचीन आयुर्वेद सांगते.
अनेक जाहिरांतीमध्ये नितळ, चमकदार त्वचेसाठी महागडे प्रॉडक्‍ट्‌स वापरण्यचा सल्ला दिला जातो. मात्र सौंदर्याचे काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरातील हळदीमध्ये सापडतात. बहुगुणी हळद सौंदर्यवर्धक असण्याबरोबरच आरोग्यदायी आहे. हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदविकार, मधुमेह, कर्करोगापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया चांगली असली की, पोटाचे काम सुरळित सुरू होते. यकृताचे कार्य चांगले चालते. यासाठी दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाच हजार वर्षांपासून हळदीला आयुर्वेदात महत्व आहे. हळदीत असलेले करक्‍यूमिनसारखे औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून बचाव करतात.

 सविस्तर वाचा - का घेतला महिलांनी घरीच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय, वाचा

 

  • हळद अग्निची शक्ती वाढवते. पोट आणि यकृताची शक्ती वाढवते, अर्थात रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
  • पिंपळी रसधातूची शक्ती वाढवण्यास मदत करते. शरीरात कफ तयार होऊ देत नाही. कोरडा खोकला-दमा दूर करण्यास मदत होते.

प्रतिकार शक्‍ती वाढवणे गरजेचे
कोरोनासारख्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. परंतु प्रत्येक ठिकाणी हे पाळले जाईलच असे नाही. कोरोना विषाणूची लस कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे शरीरच कोरोनासारख्या विषाणूशी लढण्यासाठी सक्षम करावे. हळदीचा चहा अर्थात गोल्डन "टी' किती गुणकारी असतो याचा अनुभव आपण घेतला आहे. हळद आणि पिंपळी यांचे एक ग्रॅम पर्यंतचे मिश्रण घ्यावे.
डॉ. सुनील जोशी, आयुर्वेद पंचकर्म सेंटर, अल्बुकर्की, अमेरिका

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turmeric & pimpli can give fight with corona