महापौरांच्या कारपासून तर कचरा गाड्यापर्यंत सर्वच वाहने सीएनजीवर रूपांतरीत करा; नितीन गडकरींची सूचना

राजेश प्रायकर
Monday, 9 November 2020

जैविक इंधनाचा वापर करणे व इंधनात स्वयंपूर्ण होणे हाही आत्मनिर्भरतेचा एक मार्ग असल्याचे नमुद करीत त्यांनी शहरातील ऑटोही सीएनजीवर चालले तर एका ऑटोचालकाला आजच्या तुलनेत ५०० रुपये अधिक मिळतील, असे सांगितले.

नागपूर : येत्या सहा महिन्यांत महापौरांच्या कारपासून तर कचरा गाड्यापर्यंत सर्वच वाहने सीएनजीवर रूपांतरीत करा, अशी सूचना केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला केली. सीएनजीसाठी लागणारे सीएनजी फिलिंग सेंटरही उभे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

धरमपेठेतील शिवाजीनगरात भाजपच्या आत्मनिर्भर भारत कार्यालयाचे ऑनलाईन उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी केली. कार्यक्रमाला खासदार विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, महापौर संदीप जोशी, भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, अशोक धोटे व अन्य उपस्थित होते.

क्लिक करा - सरकार परत घेणार शेतकऱ्यांचा ‘सन्मान’; तुमचा तर यात समावेश नाही ना

जैविक इंधनाचा वापर करणे व इंधनात स्वयंपूर्ण होणे हाही आत्मनिर्भरतेचा एक मार्ग असल्याचे नमुद करीत त्यांनी शहरातील ऑटोही सीएनजीवर चालले तर एका ऑटोचालकाला आजच्या तुलनेत ५०० रुपये अधिक मिळतील, असे सांगितले.

सेंद्रीय खत निर्मिती घरच्या घरी शक्य असून ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवून शहरात प्रायोगिक तत्त्वावर २५ हजार घरांपर्यंत घरगुती कचऱ्यातून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. लहान-लहान उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल व तरुण स्वावलंबी होतील. हीच आत्मनिर्भर भारताची संकल्पना असल्याचेही गडकरी म्हणाले.

अधिक वाचा - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

...तर तरुण शहराकडे धाव घेणार नाही

गरिबीमुळे ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे येतात व शहरातील समस्या जटिल होतात. गावातच रोजगार उपलब्ध झाला तर तरुण शहराकडे धाव घेणार नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील हस्तकला, हातमाग, हस्तकलेचे उद्योग, कुटीर उद्योग यांचा विकास करून गावातील उद्योगांना मजबूत करणे, विकास करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखी, समृद्ध, शक्तिशाली भारत निर्माणसाठी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पुढे आणल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turn all vehicles on CNG in six months