काही दिवसांसाठी आत्याकडे राहायला आला मुलगा; फोन आल्यानंतर वडिलांनी फोडला हंबरडा

मनोहर घोळसे
Monday, 4 January 2021

सावनेर (जि. नागपूर) : स्थानिक गडकरी चौकातून स्कुटीने डब्लूसीएलकडे जाताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने स्कुटीला समोरासमोर जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटीचालक जखमी झाला. तर मागे बसलेला बारा वर्षीय मुलगा जागीच ठार झाल्याची घटना सावनेर शहरात घडली. भूषण सुरेश कुमरे (वय १२, रा. खापा) असे मृत बालकाचे नाव आहे. शंकर रमेश जाधव (वय १४, रा. बजाज कॉलनी, डब्ल्यूसीएल सावनेर) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक गडकरी चौकातून एमएच ४० बीएस ०३९२ क्रमांकाच्या दुचाकीने भूषण व शंकर हे जात होते. डब्ल्यूसीएलकडे जात असताना कोलार नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने वाहन वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.

जाणून घ्या - शेतातील विहिरीत तरंगतांना दिसला बिबट्याचा मृतदेह; बाहेर काढताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

या धडकेत भूषण व शंकर दोघेही पडले. अज्ञात वाहन चालकाने भूषणच्या अंगावर गाडी चढवल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी भूषणला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच जखमी शंकरला उपचारासाठी नागपूरला ‘रेफर’ करण्यात आले.

मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे. मृत बालकाचे आई-वडील मजुरी करतात. भूषण हा खापा येथे पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. तो सावनेर येथील डब्लूसीएलमध्ये राहणाऱ्या आत्याकडे आला होता. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांनी तर या घटनेमुळे हंबरडाच फोडला होता.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A twelfth year old boy was killed in a collision with an unknown vehicle