आंदोलन चिघळले, वीस प्रकल्पग्रस्तांना अटक

रूपेश खंडारे
Sunday, 4 October 2020

सिंगोरी कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन गुरुवारी सकाळपासून सुरू केले. काही तोडगा निघाला न निघाल्यामुळे आंदोलन तीन दिवस चालले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता वेकोलि प्रशासनाने पोलिसांच्या साहायाने आंदोलन मोडीत काढले.

पारशिवनी (जि. नागपूर) : सिंगोरी परिसरातील सिंगोरी, डोरली, साहोली व हिंगणा गावाच्या सिमेत वेकोलिने तीन वर्षांपूर्वी कोळसा खाण सुरू केली. त्यावेळी गावातीलच युवकांना काम देऊ व प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करू असे सांगून जमिनी हस्तांतरित करून घेतल्या. परंतु, वास्तव्यात जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हा गावकऱ्यांच्या हातात भोपळा दिला, असा आरोप करीत संताप अनावर झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी कंपनीतील काम बंद पाडले व वाहतूक रोखून धरली. शनिवारी दुपारी पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

तीन दिवसांपासून आंदोलन शांततामय मार्गाने सुरू होते. आंदोलनाच्या माध्यमातून कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. तरीही शनिवारी कुठलीही सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नाही. वरिष्ठांच्या आदेशाने आंदोलन मोडीत काढत आंदोलकांना अटक केली, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा - बाल्या बिनेकर हत्याकांड : सहाव्या आरोपीला अटक, सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा

सिंगोरी कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन गुरुवारी सकाळपासून सुरू केले. काही तोडगा निघाला न निघाल्यामुळे आंदोलन तीन दिवस चालले. शनिवारी दुपारी १२.३० वाजता वेकोलि प्रशासनाने पोलिसांच्या साहायाने आंदोलन मोडीत काढले. पारशिवनी पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून २० आंदोलकांना अटक केली.

अटकेनंतर कार्यवाही करून आंदोलकांना सोडण्यात आले. यानंतर वेकोलिची वाहतूक सुरळीत सुरू झाली. या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष हर्षवर्धन निकोसे, माजी सरपंच विजय निकोसे, प्रमोद काकडे, अमजद पठाण, सुरेश बागडे यांसह परिसरातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

या मागण्यांसाठी केले आंदोलन

  • सिंगोरी, साहोली, डोरली व हिंगणा गावातील स्थानिक युवकांना कोलमाईन्स व कंत्राटदार कंपनीमध्ये कामावर ठेवण्यात यावे.
  • ब्लास्टिंगमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात यावी.
  • परिसरातील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करून द्यावी.
  • प्रकल्पग्रस्तांवर लावलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे.
  • चारही गावात जलशुद्धीकरण यंत्र लावण्यात यावे.
  • पक्के रस्ते निर्माण करण्यात यावे.
  • सीएसआर फंडातून श्री चक्रधर प्रभू शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात यावे.

सविस्तर वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही
तूर्तास पोलिसांच्या मदतीने वेकोलिने आमचे आंदोलन मोडून काढले. परंतु, आम्ही हार मानणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी पुन्हा कंपनी बंद आंदोलन करण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
- हर्षवर्धन निकोसे,
माजी जि. प. कल्याण सभापती

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty project victims were arrested in Nagpur