त्याने थकवली लाखोंची उधारी... आणि सापडला संकटात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

उधारीच्या पैशांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. रात्रभर ओलीस ठेवल्यानंतर अभिषेक हादरला. कसेही करून एखाद्या मित्राकडून पैसे जमवून देण्याची ग्वाही आरोपींना दिली. त्यावर विश्‍वास ठेवून आरोपींनी त्याला शहरात आणले.

नागपूर : उधारीच्या पैशाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. हिंगणा मार्गावर खोलीत रात्रभर डांबून ठेवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. व्यावसायिकाने कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेत कोतवाली ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवीत आरोपींचा शोध सुरू केला.
अभिषेक प्रकाश जबलपुरे (22) रा. चित्रा टॉकीजजवळ, गवळीपुरा असे अपहृत व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा चहाचे कप व डिस्पोजल साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.

सविस्तर वाचा - तीन मुलांच्या आईला प्रियकराने दिला धोका अन झाले विपरित

ग्रीन पार्क, हिंगणा येथील रहिवासी दानिश खान (26), शादाब इकबाल खान (25), इरशाद इकबाल खान (26) यांच्याकडून तो उधारीवर माल आणायचा. हळूहळू उधारीची रक्कम वाढत जाऊन तब्बल साडेतीन लाखांवर पोहोचली. उधारीच्या पैशांवरून खान बंधूंचा अभिषेकसोबत वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास दानिश आणि शादाब हे दोघे अभिषेकच्या घरासमोर आले. त्याला बाहेर बोलावले आणि बळजबरीने आपल्या बुलेटवर बसवून घेऊन गेले. आरोपींचे साथीदार इरशाद, अमीर बालाघाटे, दानिश बालाघाटे पूर्वीपासूनच क्रिटीकेअर हॉस्पीटलजवळ चारचाकी वाहन घेऊन उभे होते. आरोपी अभिषेकला थेट त्यांच्याकडे घेऊन गेले. यानंतर आरोपींनी त्याला कारमध्ये बसविले आणि हिंगणा येथील रेमॅक्‍सन इंडस्ट्री रोड येथे नेले. तिथे एका खोलीत डांबून ठेवून जबर मारहाण केली. उधारीच्या पैशांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. रात्रभर ओलीस ठेवल्यानंतर अभिषेक हादरला. कसेही करून एखाद्या मित्राकडून पैसे जमवून देण्याची ग्वाही आरोपींना दिली. त्यावर विश्‍वास ठेवून आरोपींनी त्याला शहरात आणले. संधी साधून तो आरोपींच्या तावडीतून निसटला. कोतवाली ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two men kidnapped one due to credit money