arrest
arrest

संघ मुख्यालय परिसरातून दोन संशयित ताब्यात, करत होते चित्रिकरण

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालय परिसरात चकरा मारणाऱ्या दोन संशयित युवकांना बुधवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. या घटनेची माहिती पसरताच एकच खळबड उडाली. प्रदीर्घ चौकशीनंतर दोन्ही युवकांची सुटका करण्यात आली.

फैजल (32) आणि बिंडा ऊर्फ निलोत्तम (27) अशी या युवकांची नावे आहेत. दोघेही बेंगळुरूचे रहिवासी आहेत. दोघांनीही डॉक्‍युमेंट्रीचा अभ्यासक्रम केला असून ते लघुपट तयार करतात. बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ते मुख्यालय परिसरात आले. बराचवेळ इकडे तिकडे फिरत होते. त्यांची वेगवेगळ्या भागातून इमारतीचे फोटोही काढले. हा प्रकार सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात येताच दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे ते प्रचंड घाबरले. त्यातच प्रश्‍नांचा भडीमार झाल्याने त्यांचा गोंधळ उडाला. हिच बाब संशय अधिकच गडद करणारी ठरली.

संशयामुळे सुरक्षा यंत्रणांनी कोतवाली पोलिसांना सूचना देत पाचारण केले. लागलीच पोलिस आणि दहशतवाद विरोधी सेलचे पथकही दाखल झाले. रात्री दोघांनाही ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. बेंगळुरूचे राहणारे असल्याने तिथला पोलिसांसोबत संपर्कसाधून युवकांबाबत माहिती देण्यात आली. सोबतच त्यांचे रेकॉर्डही मागवून घेण्यात आले. दोघेही देत असलेली माहिती खरी असून ते आकर्षणापोटीच या भागात आल्याची खात्री झाल्याने शुक्रवारी दुपारी पोलिसांनी त्यांना सोडून दिले.

दोन्ही युवक रायपूर येथे आयोजित इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. ते आटोपून गुरुवारी नागपुरात आले. बेंगळुरूला जाणारी रेल्वे मध्यरात्री असल्याने नागपुरातील महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्याचा बेत आखला. विचारपूस करीत ते संघ मुख्यालय परिसरात पोहोचले. त्यांनी मोबाईलने इमारतीचे चित्रिकरणही केले हिच त्यांची चूक ठरली.

दहशतवाद्यांकडून यापूर्वी संघ मुख्यालयावर झालेला आत्मघाती हल्ला स्थानिक पोलिसांनी उधळून लावला होता. त्यानंतर मुख्यालय परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात मुख्यालया भोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अगदी 24 तास सशस्त्र जवान कोणत्याही परिस्थितीचा सामाना करण्यासाठी सज्ज असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com