बेरोजगार एनआयएस प्रशिक्षक चालविताहेत प्रशिक्षण केंद्रे  ! 

file photo
file photo

नागपूर : महाराष्ट्रातील अनेक खेळाडू व प्रशिक्षक मेहनत करून देशातील नामवंत संस्थेतून एनआयएस प्रशिक्षक झाले. हा प्रतिष्ठेचा व कठीण कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना सरकारकडून नोकरीची माफक अपेक्षा असते. परंतु शासनाच्या उदासिन धोरणामुळे अनेक जण सध्या बेरोजगार आहेत. एनआयएस प्रशिक्षकांची कामे बी.पीएड. व एम. पीएड. झालेले अननुभवी प्रशिक्षक करीत असल्यामुळे अपेक्षित साध्य होत नसल्याची चर्चा मुष्टियुद्ध वर्तुळात आहे. शासनाने अनुभवी दर्जेदार प्रशिक्षकांची नियुक्ती न करणे राज्यातील मुष्टियुद्धाच्या पिछेहाटीचे मुख्य कारण बोलले जात आहे. 

मुष्टियुद्ध हा ऑलिम्पिक आणि खात्रीने पदक मिळवून देणारा खेळ मानला जातो. मात्र तरीही राज्य सरकार या खेळाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. ३६ जिल्ह्यांमिळून केवळ दोनच पात्रता असलेले शासकीय प्रशिक्षक सध्या कार्यरत आहेत. उल्लेखनीय म्हणजे हे दोन्ही प्रशिक्षक विदर्भात आहेत. चंद्रपूर येथे विजय ढोबारे आणि अकोला क्रीडा प्रबोधिनीत एकमेव एनआयएस प्रशिक्षक सतीश भट युवा खेळाडू घडवित आहेत. महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेचे महासचिव डॉ. राकेश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला महाराष्ट्रात किमान १५ ते २० एनआयएस प्रशिक्षकांची गरज आहे. सुदैवाने तेवढे प्रशिक्षकही उपलब्ध आहेत. एनआयएस झालेले १८, शॉर्ट एनआयएस कोर्स केलेले २३ आणि कोचेस सर्टिफिकेट कोर्स प्रोग्राम (सीसीसीपी) पूर्ण करणारे ३४४ प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षकांचा प्रचंड ताफा असताना शासन त्यांना नोकरी देण्याऐवजी बी. पीएड. व एम. पीएड. धारकांना कंत्राटी पद्धतीने कमी मानधनावर ठेवून आपली जबाबदारी झटकत आहेत. जाणकारांच्या मते, जे काम अनुभवी एनआयएस प्रशिक्षक करू शकतो, ते बी. पीएड. व एम. पीएड. धारक करूच शकत नाही. एनआयएस प्रशिक्षकच चांगले दर्जेदार खेळाडू घडवू शकतो. याच कारणामुळे महाराष्ट्र हरियाना व अन्य राज्यांच्या तुलनेत मुष्टियुद्धात काहीसा पिछाडीवर असल्याचे ते म्हणाले. 


राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू पतियाळा व कोलकातासारख्या प्रतिष्ठेच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) सेंटरमधून कठीण मानला जाणारा एनआयएस प्रशिक्षकाचा कोर्स करतात. दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतात. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना राज्य किंवा केंद्र सरकारकडून नोकरीची आशा असते. मात्र सरकार तेदेखील देऊ शकत नाही. त्यामुळे बहुसंख्य एनआयएस प्रशिक्षकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे बेरोजगार असलेल्या या प्रशिक्षकांनी उदरनिर्वाहासाठी ठिकठिकाणी छोटेमोठे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मुष्टियुद्धातील हेच वास्तव आहे. केवळ मुष्टियुद्धातच नव्हे, राज्यातील इतरही खेळांमध्ये हीच स्थिती आहे. सरकारने खेळाडूंना केवळ पायाभूत सोयीसुविधा देऊन भागत नाही. खेळाडूंवर उत्तम संस्कार करणारे तज्ज्ञ प्रशिक्षकही तितकेच आवश्यक आहेत. सरकारने एनआयएस प्रशिक्षकांचा मुद्दा गांभीर्याने घेतल्यास महाराष्ट्राच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीत निश्चितच सुधारणा होऊ शकते. शिवाय 'खेलो इंडिया'तही मोठी झेप घेऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

'महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एनआयएस प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात आम्ही यापूर्वीच शासनाच्या क्रीडा विभागाला पत्र लिहिले आहे. आजच्या स्थितीत आठ विभागांमध्ये प्रत्येकी दोन प्रशिक्षक नियुक्त केल्यास खेळाडूंना मोठी मदत होऊ शकते. आमच्या पत्रावर शासन गांभीर्याने विचार करेल, अशी आमची अपेक्षा आहे.' 
-डॉ. राकेश तिवारी, महासचिव, महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटना  

संपादन : नरेश शेळके 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com