शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : विदर्भातील संत्रा ३६ तासांत पोहोचणार बांग्लादेशात, ते कसे वाचाच

योगेश बरवड
Monday, 14 September 2020

एकीकडे वाहतूक महागडी ठरते तर दुसरीकडे अधिक वेळ लागत असल्याने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढते. किसान रेल्वे सुरू झाल्यास वेळेची बचत होईल. वाहतूक किफायतशीर होईल. सोबतच अधिक ताजी संत्री बाजारात गेल्याने दरही चांगला मिळेल. नितीन गडकरी यांच्या प्रस्तावाला रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे.

नागपूर : विदर्भातील संत्र्याला बांग्लादेशात मोठी मागणी आहे. किसान रेल्वेद्वारे केवळ ३६ तासांत संत्रा बांग्लादेशात पोहोचविला जाऊ शकतो. वरुड, नागपूर, काटोल, नरखेडमार्गे किसान रेल्वे चालविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना केली आहे.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोमेश कुमार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह अन्य रेल्वे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बांग्लादेश ही संत्र्याचा मोठी बाजारपेठ आहे. एकूण उत्पन्नाच्या दोनतृतीयांश म्हणजे सुमारे अडीच लाख टन संत्रा दरवर्षी बांग्लादेशात निर्यात होतो. परंतु, थेट रेल्वेची सुविधा नाही. रस्ते मार्गाने वाहतुकीसाठी ७२ तास लागतात.

अधिक माहितीसाठी - काही सेकंदात ओळखा तुमच्या अन्नातील भेसळ; हे उपाय करून बघाच

एकीकडे वाहतूक महागडी ठरते तर दुसरीकडे अधिक वेळ लागत असल्याने माल खराब होण्याचे प्रमाणही वाढते. किसान रेल्वे सुरू झाल्यास वेळेची बचत होईल. वाहतूक किफायतशीर होईल. सोबतच अधिक ताजी संत्री बाजारात गेल्याने दरही चांगला मिळेल. नितीन गडकरी यांच्या प्रस्तावाला रेल्वे अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरच याचा रोडमॅप तयार होईल, असे आश्वासन सोमेशकुमार यांनी दिले.

साधारणपणे वीस डब्यांची असेल रेल्वे

किसान रेल्वे साधारणपणे वीस डब्यांची असेल. त्यातून ४६० टन माल वाहून नेला जाऊ शकेल. वरुड, नागपूर, काटोल, नरखेड रेल्वेस्थानकावरून शेतकरी माल गाडीतून पाठवू शकतील. त्यासाठी विशेष वेबसाइट तयार करून आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी केली. बांग्लादेशप्रमाणेच दिल्ली, मुंबई, बंगलोर, जयपूर यासारख्या महानगरांनासुद्धा किसान रेल्वेच्या माध्यमातून माल पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचीही सूचना त्यांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister Nitin Gadkari instructed to start Kisan Railway