शेतकऱ्यांनो, दुबार पेरणी टाळण्यासाठी घरचेच बियाणे वापरा; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

नीलेश डोये
Saturday, 3 October 2020

शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात तयार झालेले सोयाबीन काही प्रमाणात वाचवून ठेवावे. त्यानंतर ते उन्हामध्ये वाळू न घालता सावलीच वाळवावे. यानंतर ते पोत्यामध्ये ठेवत ते पोते जमिनीपासून सहा इंच उंचीवर लाकडी फळ्या अथवा बांबूवर ठेवावे. याचा पुढील हंगामात बियाणे म्हणून उपयोग करण्‍याचा सल्ला कृषी विभागाचा आहे.

नागपूर : कपाशीवर होणाऱ्या बोंडअळीचा हल्ला व त्यामुळे उत्पादनात घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी केली. मात्र, बियाणे न उगविल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतातील सोयाबीन राखून ठेवत पुढील हंगामात बियाणे म्हणून वापरावे यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार असून बोगस बियाण्यांचा प्रश्नही निर्माण होणार नसल्याचे मत कृषी विभागाचे आहे.

जिल्ह्यात दरवर्षी कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. परंतु, कपाशीच्या पेरणीनंतर शेतकरी रब्बीमध्ये दुसरे पीक घेऊ शकत नाही. त्यामुळे कृषी विभागाकडून कमी कालावधीच्या पिकांना प्राधान्य देण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनसारख्या कमी कालावधीच्या पिकाकडे कल केला.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्यात. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांना बियाण्यांच्या उगवण समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात तयार झालेले सोयाबीन काही प्रमाणात वाचवून ठेवावे. त्यानंतर ते उन्हामध्ये वाळू न घालता सावलीच वाळवावे. यानंतर ते पोत्यामध्ये ठेवत ते पोते जमिनीपासून सहा इंच उंचीवर लाकडी फळ्या अथवा बांबूवर ठेवावे. याचा पुढील हंगामात बियाणे म्हणून उपयोग करण्‍याचा सल्ला कृषी विभागाचा आहे.

उगवणशक्ती अशी तपासावी

शंभर दाणे मोजून घ्या. दोन सारख्या कुंड्यामध्ये किंवा शेतात एखादी चांगली जागा पाहून शंभर बिया ४-५ सें.मी. पेक्षा खोल जाणार नाही याची दक्षता घेऊन पेरून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी द्या. ७-८ दिवसांनी उगवण झालेल्या बिया मोजून घ्या. जेवढ्या बिया रुजल्या असतील तेवढी त्या बियाण्यांची उगवण शक्ती समजावी.

सविस्तर वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर

बियाणे राखून ठेवताना काळजी घ्या
बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी नेहमीच येतात. शेतकऱ्यांनी कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांवर विसंबून न राहता स्वत:कडील बियाण्यांचा वापर करावा. बियाणे राखून ठेवताना काळजी घ्यावी. मळणी झाल्यावर सोयाबीन स्वच्छ करून घ्यावे. ते पोत्यामध्ये ठेवावे. सावलीत वाळवावे. पुढील खरिपात त्याच बियाण्यांची शेतात पेरणी करावी.
- मिलिंद शेंडे,
जिल्हा कृषी अधीक्षक.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valuable advice of the Department of Agriculture for farmers