उपराजधानीतील आणखी `हे` परिसर प्रतिबंधित क्षेत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

दररोज नवनव्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 50 पर्यंत पोहोचली आहे. 

नागपूर  : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने डोबीनगर, जुनी मंगळवारीतील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज याबाबत आदेश काढले. दररोज नवनव्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 50 पर्यंत पोहोचली आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

आज गांधीबाग महाल झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 8 मधील डोबीनगरातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला. डोबीनगरात उत्तर पश्‍चिमेस हमीद अंसारी यांचे घर, दक्षिण पूर्वेस रमजान भाई यांचे घर, उत्तर पूर्वेस जावेद भाई यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला. याच झोनमधील प्रभाग 22 अंतर्गत जुनी मंगळवारी भागातील लाल शाळेसमोरील परिसरात निर्बंध लावण्यात आले.

दक्षिण पश्‍चिमेस डॉ. ए. ए. सार्वे यांचे क्‍लिनिक, उत्तर पश्‍चिमेस लक्ष्मण खोत यांचे घर, उत्तर पूर्वेस लाखे यांचे घर, दक्षिण पूर्वेस तलमले किराणा दुकानापर्यंतचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राचे बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे.

शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्‍यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्‍टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्तींना मात्र वगळण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various premises in Nagpur declared as restricted areas