रस्त्याच्या बाजूला वाहने उभी केलीत, आम्ही चोरी केली का, वाहतुकदारांचा प्रश्‍न

सोपान बेताल
Friday, 9 October 2020

आजतागायत स्थानिक वाहन चालविणाऱ्या मालकांना वाहन उभे करण्यासाठी एमआयडीसीने सोय केली नाही. उलट रस्त्याच्या बाजूला वाहने उभी केली की वाहतुक पोलिस ‘चालान’ फाडून दंड ठोकतात. यासाठी मालवाहतुकदारांनी एमआयडीसीत ट्रान्सपोर्ट प्लाझा उभारण्याची मागणी केली. ‘

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी केल्या. शेतकऱ्यांच्‍या मुलांना कंपनीत नोकरी देण्याचे मान्य केले. कामही मिळाले. पण आता कंपन्याच बंद झाल्याने नोकरी गेली. युवक बेरोजगार झाले. पोटापाण्यासाठी बॅंकेतून कर्ज घेतले. मालवाहतूक करणारी वाहने खरेदी केली. पण आजतागायत स्थानिक वाहन चालविणाऱ्या मालकांना वाहन उभे करण्यासाठी एमआयडीसीने सोय केली नाही. उलट रस्त्याच्या बाजूला वाहने उभी केली की वाहतुक पोलिस ‘चालान’ फाडून दंड ठोकतात. यासाठी मालवाहतुकदारांनी एमआयडीसीत ट्रान्सपोर्ट प्लाझा उभारण्याची मागणी केली. ‘सकाळ’शी त्यांच्या समस्येबाबत  बोलताना त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

अधिक वाचाः आमदानी अठ्ठनी, खर्चा रुपया, त्याचेच नाव सोयाबीन

वाहनमालकांना न्याय मिळावा
आम्ही वाहनमालक सरकारला अनेक प्रकारचा कर देतो. यात लाईसन्स, परमिट, रोड टॅक्स, विमा याचा समावेश आहे. या माध्यमातून सरकारची तिजोरी भरतो, पण आम्हाला वाहने उभे करण्याची सरकार सोय करित नसल्याने चोरासारखी जागा मिळेल तिथे वाहन उभे करावे लागते. तेव्हा स्थानिक वाहनमालकांना गाड्या उभ्या करण्यासाठी एमआयडीसीने ट्रान्सपोर्ट प्लाझा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे संघर्ष ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष मंगेश हरणे यांनी सुचविले. एमआयडीसीत गाड्या उभ्या करण्यासाठी सोय नसल्याने रस्त्याच्या बाजूलाच गाड्या उभ्या करावे लागतात.  वाहतूक विभाग ‘नो पार्किंग’ चे चालान देते. तो भूर्दंड कोणताही गुन्हा नसताना सहन करावा लागतो. अगोदरच वाहनाचे ‘मेन्टेनंस’ करता करता आणि बॅंकेचे हप्ते भरता कंबर तुटते. जास्तीचा पुन्हा भूर्दंड भरावा लागतो, अशी प्रतिक्रिया  संघटनेचे उपाध्यक्ष विष्णू बानाईत यांनी व्यक्त केली.

हेही वाचाः सूरताल झाले बेताल, जादू झाली छूमंतर, कलेला लागली कोरोनाची नजर
 

एमआयडीसीने वाहतूकदारांकडे लक्ष द्यावे
एमआयडीसी उदयाला आली तेव्हा कंपनीत येणाऱ्या माल वाहतुकीच्या गाड्या कुठे उभ्या राहतील, हे माहीत असतानाही आजतागाईत कुठलीही सोय केली नाही. एमआयडीसीच्या नकाशात कदाचित असेलही पण एमआयडीसीने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे गाड्या रस्त्याच्या बाजूला उभ्या ठेवाव्या लागतात. संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी गाडी चालक-मालक शैलेश गायकी यांनी केली. आम्ही एमआयडीसी परिसरातील रहिवासी आहोत. कंपनीत काम केले, पण कंपनी बंद पडल्याने रोजगार गेला. पैशाची जुळवाजुळव करुन माल वाहतूक करणारी वाहने घेतली. पण ती कुठे उभी करायची हिच समस्या निर्माण झाली आहे.  आमच्या गाड्या उभ्या करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था व्हावी, असे गाडी मालक-चालकसुरेश यादव यांनी सांगितले. रस्त्याच्या बाजूला वाहने उभी केली की पोलीसांची भिती. खुल्या जागेत उभी केली की एमआयडीसीची भिती,  तर उपाशी मरावे काय? स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, असे राजकीय नेते भाषण देतात मग स्थानिक वाहनमालकांना एमआयडीसीत जागा देऊन जर ट्रान्सपोर्ट प्लाझा उभे झाल्यास आम्हाला सोईचे होईल. हक्काची जागा मिळेल, अशी आशा वाहनमालक दिनेश जुनघरे यांनी केली.

संपादकः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles parked on the side of the road, did we steal, the question of transporters