'ऊंट के मुंह में जिरा';  तालुका क्रीडा संकुलाला निधी कमी आणि विकासकामे अधिक

Very few Fund given to District sports office In Nagpur
Very few Fund given to District sports office In Nagpur

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बहुतांश तालुका क्रीडा संकुलांची अवस्था अतिशय खराब आहे. कुठे बांधकाम अर्धवट आहे, तर कुठे क्रीडा साहित्यांचा अभाव. कुठे खेळाडू आहे, तर कुठे प्रशिक्षक नाहीत. अशा स्थितीत सरकारने दोन- तीन लाखांची बोळवण करून आपली जबाबदारी झटकली. हा निधी अत्यंत अल्प असून, एकप्रकारे 'ऊंट के मुंह में जिरा' असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

क्रीडा धोरण अंतर्गत राज्यात क्रीडाविषयक सुविधा निर्माण करणे, स्थानिक खेळाडूंना सराव व प्रशिक्षण घेता यावे, या उद्देशाने शासन संकुलांच्या देखभालीसाठी दरवर्षी तीन लाख रुपयांचा निधी देते. शासनाने या वर्षीही (२०२०-२१) राज्यभरातील तालुका क्रीडा संकुलांना निधी मंजूर केला.

 नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, भिवापूर, सावनेर, हिंगणा, नरखेड, काटोल, रामटेक, मौदा, पारशिवनी, कळमेश्वर, नागपूर ग्रामीण, उत्तर नागपूर येथील संकुलांनाही एकूण ३५ लाख १७ हजार रुपये मंजूर झाले आहे. दोन-तीन तालुका क्रीडा संकुलांचा अपवाद वगळता बहुसंख्य संकुलाला प्रत्येकी तीन लाख रुपये मिळणार आहे. मात्र जाणकारांच्या मते, हा निधी पुरेसा नाही.

तालुका पातळीवर असलेले अनेक क्रीडा संकुल सध्या अपूर्णावस्थेत आहेत. त्यांना निर्धारित वेळेत तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी भरीव तरतुदीची आवश्यकता आहे. अशाप्रकारे दरवर्षी थोडेथोडके पैसे मिळत राहिल्यास उद्दिष्ट कदापि साध्य होणार नाही. याच कारणांमुळे जागोजागी संकुले खंडहर बनले आहे. 

केवळ कागदावर घोषणा नको आहे. प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता आहे. ती वास्तू निर्धारित वेळेत कशी पूर्ण होईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. शिवाय त्या वास्तूची योग्य देखभालही तितकीच महत्त्वाची आहे. तालुका पातळीवरील खेळाडूंना आज पायाभूत सुविधांसोबतच सरावासाठी क्रीडा साहित्य, संतुलित आहार, अद्ययावत तंत्रशुद्ध प्रशिक्षण, दर्जेदार प्रशिक्षक इत्यादी सर्व गोष्टी आवश्यक आहे. अनुकूल वातावरण मिळाले तरच तालुका पातळीवर उत्तम खेळाडू घडणार आहेत. राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com