लाख मोलाच्या रस्त्यांना मोठमोठ्या खड्ड्यांचे डाग; प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात गोलमाल

सुधीर भारती
Saturday, 28 November 2020

गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. मात्र, एका किलोमीटरसाठी ७० लाख रुपयांचा खर्च केल्यानंतरही एक ते दीड वर्षांतच लाख मोलाचे रस्ते उखडले जात आहेत.

अमरावती : साधारणपणे डांबरी किंवा सिमेंटचा रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसांनीच उखडण्यास सुरुवात होते, ही बाब सामान्य आहे. मात्र, एका किलोमीटरसाठी ७० लाख रुपयांचा खर्च केल्यानंतरही एक ते दीड वर्षांतच लाख मोलाचे रस्ते उखडले जात आहेत. केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात संबंधितांनी चांगलेच हात धुतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. आता अंगावर शेकण्याची चिन्हे दिसू लागताच रस्त्याच्या डागडुजीची तयारी दर्शविण्यात आली आहे.

गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात १७६ किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्यात आले. दीड वर्षापूर्वी बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्णसुद्धा झालीत. विशेष म्हणजे, एका किलोमीटरसाठी तब्बल ७० लाख रुपयांची देयके देण्यात येते. त्यामुळे या रस्त्यांच्या दर्जाबाबत किती जागरूकता ठेवण्यात आली, याचा प्रत्यय येतो; तरीसुद्धा संबंधितांनी रस्ते कामात गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अवश्य वाचा :  नागपूरकरांनो सावधान! कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे; आज नव्या ४५७ रुग्णांची भर

रस्त्याच्या दर्जाबाबत शंका

नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील कोठेडा सारसी ते माहुली चोरपर्यंतच्या सात ते आठ किलोमीटर मार्गावर खड्डे पडले असून सीलकोटसुद्धा उखडली आहे. केवळ एक ते दीड वर्षापूर्वी झालेल्या रस्त्याची ही दुरवस्था आहे. दुसरीकडे चिखलदरा तालुक्‍यातील काही ठिकाणीसुद्धा रस्त्याबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. आता याबाबतच्या तक्रारी अंगलट आल्यानंतर कंत्राटदारांकडून डागडुजी करून घेतल्याशिवाय संबंधित विभागाला पर्याय राहिलेला नाही. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अद्याप दुरुस्तीची कामे सुरू झाली नसल्याचे अधिकारीच सांगत आहेत. त्यामुळे या लाखमोलाच्या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय रस्त्यांची लांबी (किलोमीटर)

अमरावती १२.७७, अचलपूर ९.४४, अंजनगावसुर्जी ७.२६, भातकुली ८.३७, चांदूरबाजार १०, चांदूररेल्वे ८.०८, चिखलदरा ३६.३४, दर्यापूर ११.६७, धामणगावरेल्वे ९.२१, धारणी २१.१८, मोर्शी ११.५७, नांदगावखंडेश्‍वर ११.२८, तिवसा ८.०७, वरुड १०.७४, एकूण १७६ किलोमीटर

जाणून घ्या :  क्या बात है! अमरावती विद्यापीठाने बनवला 'सिल्व्हर नॅनो मास्क'; कोरोनापासून होणार बचाव

देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांची
नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यांतर्गत सारसी कोठोडा ते माउली चोर या मार्गाचे ‘सील कोट’ उखडल्याचे आढळून आले आहे. हे काम जुनेच आहे. संबंधित कंत्राटदाराने ते मान्य केले असून करारानुसार रस्त्याची डागडुजी करून देण्यास तयारी दर्शविली आहे. पाच वर्षापर्यंत मार्गाच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारांची आहे. त्यामुळे कुठे तक्रारी असल्यास रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल.
- ए. ए. खान, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golmaal in the work of Pradhan Mantri Gramsadak Yojana