कोण कोण आहेत विदर्भाचे भुषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

समाजकार्य करणाऱ्यांना विदर्भभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासह, सामाजिक कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ यावेळी पार पडला.

नागपूर : शहरातील गुन्हेगारीपेक्षाही कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांची संख्या मोठी असल्याने, पोलिस विभागातर्फे गुन्हे नोंदविण्याबरोबरच समुपदेशनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. शहरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्र बेरात्री सतत सेवा करण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत असते. पोलिसांची नोकरी प्रामाणिकपणे करणे हीच मोठी समाजसेवा असल्याचे मत गुन्हे शाखेतील अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी व्यक्त केले.

सीताबर्डी येथील झाशी राणी चौकात असलेल्या हिंदी मोरभवन येथे यशवंत भारती लोककल्याण संस्थेतर्फे आयोजित समारंभात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना "विदर्भभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, माजी आमदार गेव्ह आवारी, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. पी. शिवस्वरूप, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, प्रा. प्रताप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष भूषण भस्मे यांनी प्रास्ताविकात संस्थेची भूमिका विशद केली.

सविस्तर वाचा - वंध्यत्वाला कारणीभुत आजची जीवनशैली आणि ताणतणाव

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त भरणे यांनी यावेळी जिल्ह्यातील सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत, पोलिस यंत्रणा सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असल्याने, नागरिकांनीही कुठलीही शंका मनात न ठेवता संपर्क साधण्याचे आवाहन केले. संपादक शैलैश पांडे म्हणाले की, समाजाचे चांगले काम करणाऱ्या लोकांच्या मागे यशवंत भारती लोककल्याण संस्थेसारख्या संस्था उभ्या राहतात. समाज सुधारकाचे काम सरकार नव्हे, तर जनतेलाच पार पाडावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांनी सांगितले की, समाजातील माणुसकी हरवत असून, समाजकंटकाच्या नादी लागून, लोकांची घरे जाळण्यापेक्षा कुणाच्यातरी घरातील चूल जाळण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमात समाजकार्य करणाऱ्यांना विदर्भभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यासह, सामाजिक कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात सत्कार समारंभ यावेळी पार पडला. किरण वानखेडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

विदर्भभूषण पुरस्कार्थी
डॉ. ज्ञानेश्‍वर टेंभरे, डॉ. महादेव नगराळे, डॉ. अनिल वैद्य, प्रा. डॉ. प्रीती तोटावार, गुरुप्रसाद वनाळकर, प्रा. डॉ. प्रीतम गेडाम, डॉ. उत्तम तुरनकर, डॉ. सोनल कोलते, कृष्णकांत पाठक, ताराचंद चौबे, माधुरी यावलकर, शैलेश गायकवाड, रमेश कोहळे, अरुण घारपुरे, डॉ. सुनील मानकीकर, डॉ. सच्चिदानंद मिश्रा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbh Bhushan award distributed in Nagpur