नागपूर : एसीबीचा पोलिस निरीक्षकच निघाला लाचखोर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

या अर्जावर काय कारवाई झाली हे जाणून घेण्यासाठी तक्रारदाराने सर्व्हेअर आश्रय मधुकर जोशी याची भेट घेतली. त्यावेळी जोशीने हे काम करण्यासाठी तक्रारदारास एक लाखाची मागणी केली होती. जोशी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

नागपूर : लाच घेताना सापळा रचून अटक केलेल्या आरोपीचा वाढीव पीसीआर घेऊ नये आणि महिला अधिकाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी चक्‍क अँटिकरप्शन ब्यूरोच्या पोलिस निरीक्षकाने अडीच लाखांची लाच मागितली. महिला अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे एसीबीच्या पोलिस निरीक्षकाला त्याच्याच सहकारी पोलिसांनी लाच मागितल्याप्रकरणी ट्रॅप करून अटक केली. पंकज शिवराम उकंडे (रा. त्रिमूर्तीनगर, रिंग रोड) असे या लाचखोर पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडे प्लॉट येथे राहणाऱ्या एका तक्रारदाराची बापूनगर येथे 2693.47 चौरस फुटांचा प्लॉट होता. त्यापैकी 894.47 जागेचा वाद न्यायालयात सुरू होता. या प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागला. 894.47 चौरस फूट जागा त्यांचा वडिलोपार्जित प्लॉट 114 मध्ये समाविष्ट करण्यासाठी तक्रारदाराने नगर भूमापन अधिकारी क्र. 2 यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर काय कारवाई झाली हे जाणून घेण्यासाठी तक्रारदाराने सर्व्हेअर आश्रय मधुकर जोशी याची भेट घेतली. त्यावेळी जोशीने हे काम करण्यासाठी तक्रारदारास एक लाखाची मागणी केली होती. जोशी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

हेही वाचा - आता चिअर्सला नोंद लिमिट, या अल्कोहलचा लागला शोध

लाचखोर जोशी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक पंकज उकंडे यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार, 8 नोव्हेंबर 2019 रोजी सक्करदरा येथील क्रिकेट मैदान येथे सापळा रचला होता. जोशी यास संशय आल्याने त्याने लाचेचे पैसे न घेता तेथून पळ काढला. या प्रकरणी 14 नोव्हेंबर रोजी सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आश्रय जोशी यास अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पीआय पंकज उकंडे हेच करीत होते.

क्लिक करा - मंदिरात दर्शन घेऊन वृद्ध दाम्पत्य गेले शेतावर... नंतर झाले अदृश्‍य

एसीबीच्या अधिकाऱ्यानेच मागितली लाच

आश्रय जोशी यास अटक केल्यानंतर त्याचा वाढीव पोलिस कोठडी रिमांड न घेण्यासाठी पीआय पंकज उकंडे यांनी 50 हजारांची मागणी केली. त्याचप्रमाणे या प्रकरणात भूमापन अधिकारी सारिका कडू यांचा काहीएक संबंध नसताना त्यांना सहआरोपी करण्याची धमकी पीआय उकंडे यांनी केली होती. या महिला अधिकाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईचा प्रस्ताव न पाठविण्यासाठी दोन लाखांची मागणी केली. याप्रकरणी कडू यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पीआय पंकज उकंडे यांनी पैशाची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

लाचखोर पीआय गेला रजेवर!

पंधरा दिवसांपूर्वी पीआय उकंडे यांना त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार झाल्याचे समजताच ते रजेवर गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीआय योगिता चाफले आणि अहेरकर यांनी त्यांची घरझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत घरझडती सुरू असल्याने नेमके काय सापडले, हे समजून आले नाही. पीआय पंकज उकंडे यांच्यावर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आता कुणावर विश्‍वास ठेवावा?

कुणी शासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितली, तर एसीबीकडे तक्रार करण्याचा पर्याय असतो. मात्र, चक्‍क एसीबीचेच अधिकारी लाच मागायला लागले, तर लाचखोरांच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्यांनी कुणाकडे जावे? असा प्रश्‍न पडला आहे. कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एसीबीची प्रतिमा मलिन झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha nagpur acb police took bribe