मंदिरात दर्शन घेऊन वृद्ध दाम्पत्य गेले शेतावर... नंतर झाले अदृश्‍य 

file photo
file photo

सेलू (जि. वर्धा) : तालुक्‍यातील घोराड अंतर्गत येत असलेल्या डोरली शिवारातील शेतात असलेल्या एका झोपडीत वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता. 24) सकाळी आठ वाजताच्या सुमारस उजेडात आली. दोघांचाही गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

महादेव लक्ष्मण खिरटकार (वय 60) तर लक्ष्मीबाई महादेव खिरटकार (वय 55) रा. वॉर्ड क्रमांक दोन अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची हत्या का आणि कोणी केली याचा तपास स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत. 

दुर्गंधीमुळे प्रकार आला उजेडात 
महादेव खिरटकार यांचे शेत डोरली शिवारात आहे. या शेतात राहण्यासाठी एक झोपडी बांधण्यात आली होती. हे दोघेही कधी घोराड येथे त्यांच्या घरी तर कधी शेतातील झोपडीत राहात होते. शनिवार (ता. 18) महादेव आणि लक्ष्मीबाई हे पती पत्नी घोराड येथील मंदिरातून दर्शन घेऊन सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान जेवणाचा डबा घेऊन शेताकडे जाताना अनेकांनी पाहिले. तेव्हापासून ते कुणालाही दिसले नसल्याचे सांगण्यात येते. 

दोन दिवसांपूर्वीच घडली घटना 
मंगळवारी सकाळी शेजारी शेतकरी माकडे हाकलण्यासाठी झोपडीजवळ गेले असता त्याला सदर प्रकार दिसला. त्याने घटनेची माहिती त्वरित सेलू पोलिसांना दिली. घटना स्थळावर सुटलेल्या दुर्गंधीमुळे व भरल्या डब्ब्यामुळे ही हत्या शनिवारीच झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार मृत वृद्धेच्या गळ्यावर कपाशीचे झाड उपटण्याकरिता वापरण्यात येत असलेला चिमटा ठेवून होता. तर पतीच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळून होता. तसेच जेवणाचा डबा भरलेल्या स्थितीत होता. सेलू पोलिसांनी सदर प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे. 


महादेव खिरटकार यांना दोन मुले असून ते गावातच वेगळे राहात होते. त्यांची एक मुलगी 15 वर्षी पूर्वी वारली असून एक मुलगी वलगाव (अमरावती) येथे वास्तव्यास आहे. या दुहेरी खुनाचे रहस्य उघडण्याचे सेलू पोलिसांना आव्हान असून संशयावरून पोलिसांनी काहींना ताब्यातही घेतले आहे. घटना स्थळावर वर्धा येथील श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. 

घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी 
दुहेरी खुनासारखी गंभीर घटना घडल्याने पोलिस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, ठाणेदार सुनील गाढे आदींनी भेट देत परिस्थितीचे अवलोकन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com