तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक अजुनही कागदावरच

केवल जीवनतारे
बुधवार, 15 जानेवारी 2020

गोड गळा आणि सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी लावणी सातासमुद्रापार नेली. शासनाने विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविले. मात्र राज्य शासनाने पुण्यातील "जुन्नर' येथे तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक उभारण्याची केलेली घोषणा अद्याप फाइलबंद आहे. स्मारकाचा प्रस्ताव कुठे धूळखात आहे, याची कुणालाही खबरबात नाही.

नागपूर : विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर. एकेकाळी तमाशा क्षेत्रात लावणी नृत्यांगना म्हणून नाव गाजवले. वयाच्या 14 व्या वर्षीपासून पायात घुंगरू बांधून रसिकांच्या मनावर हुकूमत गाजवली. "पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' ही लावणी अजरामर केलेल्या विठाबाई केवळ पोटासाठी नव्हे, तर कलेसाठी, लावणीला नृत्याचा दर्जा देण्यासाठी नाचल्या. गोड गळा आणि सकस अभिनयाच्या जोरावर त्यांनी लावणी सातासमुद्रापार नेली. शासनाने विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविले. मात्र राज्य शासनाने पुण्यातील "जुन्नर' येथे तमाशासम्राज्ञी विठाबाईंचे स्मारक उभारण्याची केलेली घोषणा अद्याप फाइलबंद आहे. स्मारकाचा प्रस्ताव कुठे धूळखात आहे, याची कुणालाही खबरबात नाही.

सविस्तर वाचा - गोरेवाडा जंगलाला आग
विठाबाईंच्या आयुष्याचा प्रवास यातनादायी आहे. आई शांताबाई आणि वडील भाऊ बापू नारायणगावकर यांची धाकटी कन्या. लहानपणापासून होत असलेली उपासमार, वयाच्या दहाव्या वर्षापासून सुरू झालेली तमाशातील लावणीची तालीम, तारुण्य ओसरल्यानंतर वाट्याला आलेले उपेक्षित वार्धक्‍य, असे आयुष्य त्यांनी भोगले. तमाशाच्या फडावर बिजलीसारख्या कडाडणाऱ्या विठाबाईंच्या लावणीची आठवण लेखक बाबासाहेब जोगदंड यांनी सांगितली, विठाबाई गर्भवती होत्या. नवव्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या. नाचता नाचता पोटात कळा आल्या. त्या रंगमंचामागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या. नाळ दगडाने ठेचली. पुन्हा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांनी स्टेजवर लावणी सादर केली. नाळ ठेचण्याचा हा विठाबाईच्या आयुष्यातील प्रसंग म्हणजे गरिबांच्या जगण्याचा लाइव्ह "शो' बनला. विठाबाईंनी लोककलेचे संवर्धन करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले. मायबाप प्रेक्षकांनी विठाबाईंना तमाशासम्राज्ञी पदवी बहाल केली. आयुष्यभर अत्यंत पोटतिडकीने रसिकांची करमणूक केली. लोककलेची सेवा केली. विठाबाईंच्या सेवेचे मोल लक्षात घेत त्यांना 1990 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक प्राप्त झाले. दोन वेळा त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक मिळाले. विठाबाईंना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. विठाबाईंच्या जीवनावर ओम भूतकर यांनी "विठा' हे संगीत नाटक लिहिले. 1990 मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन राज्य शासनाने त्यांना गौरविले. अ. भा. दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार प्राप्त झाला होता. अशा अष्टपैलू कलावंत विठाबाई नावाच्या "ठिणगी'ची जाणीव लक्षात घेत 2006 मध्ये झालेल्या "तमाशा महोत्सवा'त कलासक्त विठाबाई यांच्या जन्मगावी नारायणगाव येथे स्मारक उभारण्याची घोषणा केली. तब्बल 14 वर्षे लोटूनही त्यांच्या स्मारकाचा आराखडा कागदावरच आहे.

तावडे यांचे आश्‍वासन फोल
सात एप्रिल 2015 रोजी माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर या आमदारांनी विठाबाईंच्या स्मारकाचा प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित केला होता. 2016 मध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताब्यातील 2 एकर जागा स्मारक उभारण्यासाठी देण्यात येणार असून, कार्यवाही सुरू असल्याचे कळविले होते. परंतु तावडे यांचे लेखी दिलेले आश्‍वासन फोल ठरले. जलसंपदा राज्यमंत्री विनय शिवतारे यांच्याकडे नारायणगावचे सरपंच योगेश पोटे आणि जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी पत्रव्यवहार करून ही जागा देण्याची मागणी केली होती; परंतु कार्यवाहीला पुढे ब्रेक लागला.

जीवनगौरव पुरस्कार कधी?
राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करताना विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने "जीवनगौरव' पुरस्कार योजना सुरू केली. एका वर्षी हा पुरस्कार त्यांची कन्या मंगला बनसोडे यांना मिळाला होता. दरवर्षी विठाबाई यांच्या स्मृतिदिनाच्या पर्वावर 15 जानेवारीला घोषित होणारा हा पुरस्कार यावर्षी सत्ताकारणात हरवला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vithabai's smarak is only on paper