विवेका, सेव्हन स्टार हॉस्पिटलकडून ७६ रुग्णांची २४ लाखांनी लूट, पैसे परत करण्याचे आदेश

Viveka, Seven Star Hospital robbed 76 patients of Rs 24 lakh
Viveka, Seven Star Hospital robbed 76 patients of Rs 24 lakh

नागपूर : कोविड उपचारासंबंधी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दराशिवाय सुभाषनगरातील विवेका व जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ७६ रुग्णांकडून २३ लाख ९६ हजार रुपयांची लूट केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व रुग्णांना दोन दिवसांत ही रक्कम परत करण्याचे निर्देश या रुग्णालयांना दिले. दोन दिवसांत पैसे परत न केल्यास नोंदणी रद्द करण्याचा इशाराही दिला. 

राज्य सरकारने विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी उपचाराबाबत दर निश्चित केले आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांकडून राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क घेण्याचे आदेश दिले आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशाची अंमलबजावणीसाठी शहरातील विविध खासगी रुग्णालयाचे पूर्व लेखा परीक्षण करण्याकरिता लेखा परीक्षकांची नियुक्ती केली आहे.

या लेखा परीक्षकांनी दोन्ही रुग्णालयांनी ७६ रुग्णांकडून एकूण २३ लक्ष ९६ हजार ५० रुपये जास्त घेतल्याचा अहवाल मनपा आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. आयुक्तांनी दोन्ही रुग्णालयांना जास्त दर आकारल्याबाबत नोटीस दिली. या दोन्ही रुग्णालयांना ७६ रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले २३ लक्ष ९६ हजार ५० रुपये परत करण्याचे आदेश दिले.

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व इतर आनुषंगिक कायद्यान्वये अंतर्गत दोन्ही हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. २३ लाख ९६ हजार रुपये दोन दिवसांत रुग्णांना परत केल्याच्या पुराव्यासह अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दोन दिवसांत पैसे परत न केल्यास साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा, मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० मुंबई नर्सिंग होम अमेंडमेंट ॲक्ट, मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अमेंडमेंट ॲक्ट तसेच इतर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला.

अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात लेखाधिकारी संजय मांडळे, सहायक लेखाधिकारी राजेश जिभकाटे, सहायक लेखाधिकारी राजू बावनकर, वरिष्ठ लेखाधिकारी अनिल भुरे, सहायक लेखाधिकारी राजेंद्र चिंतलवार, कर निरीक्षक प्रदीप बागडे, डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. साजीया शम्स यांनी या दोन्ही हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात तपासणीची कार्यवाही केली. जास्तीत-जास्त दर आकारणाऱ्या विविध खासगी रुग्णालयांनी आत्तापर्यंत ३० लक्ष रुग्णांना परत केले आहे.

अशी केली रुग्णांची लूट
सुभाषनगरातील विवेका हॉस्पिटलने ‘रिफ्रेशमेंट चार्जेस'च्या नावावर तसेच पीपीईकिटचे जास्त दर आकारून ५० रुग्णांकडून १७ लाख ९७ हजार ४० रुपयांची लूट केली. जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलने ‘बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग चार्ज’, ‘कोविड स्टाफ मॅनेजमेंट चार्ज, इन्स्पेक्शन कंट्रोल अँड सॅनिटायजेशन चार्ज’ आणि ‘हाऊसकिपींग केअर अँड हायजिन मेंटेन चार्ज’ असे वेगवेगळे शुल्क घेत २६ रुग्णांकडून ५ लाख ९९ हजार रुपये अतिरिक्त वसूल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com