तुम्हालाही इंजेक्शनची भीती वाटतेय? मग आता काळजी नको; विद्यार्थ्याने शोधलाय हटके उपाय

VNIT student made painless injection in nagpur
VNIT student made painless injection in nagpur

नागपूर : इंजेक्शन म्हटले की सर्वांच्याच अंगावर काटा येत असतो. चिमुकल्यांच्या दाताचे उपचार करताना, इंजेक्शनचा वापर करावा लागत असल्याने उपचारावेळी रुग्णांना बराच त्रास होतो. मात्र, आता घाबरण्याचे कारण नाही. कारण की विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील विद्यार्थ्याने असे 'पेनलेस इंजेक्शन' तयार केले आहे ज्यामुळे अशा प्रकारचे उपचार करताना मुलांना न कळता इंजेक्शन लावता येणे शक्य होईल. 

लहानपणी विविध प्रकारच्या लस घेताना मुलांच्या मनात इंजेक्शनबाबत भीती निर्माण होते. ती मोठे झाल्यानंतरही कायम राहते. आजकाल लहान मुलांमध्ये चॉकलेट आणि व्यवस्थितरीत्या दात न घासल्याने दाताला कीड लागल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दंत चिकित्सकाकडे गेल्यानंतर त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना विशिष्ट भागात इंजेक्शन टोचावे लागते. मात्र, लहान मुले त्यासाठी तयार नसल्याने पालकांची दमछाक होते. त्याचा उपचारादरम्यान डॉक्टरांनाही बराच त्रास होतो. हाच विचार मनात ठेवून व्हीएनआयटीच्या यांत्रिकी (मेकॅनिकल) विभागातील एम.टेक.च्या संचित चव्हाण या विद्यार्थ्याने विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. रश्मी उद्दनवाडीकर यांच्या मार्गदर्शनात संशोधनास सुरुवात केली. यामध्ये शासकीय दंत महाविद्यालयाचे डॉ. रितेश कळसकर आणि पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. राजेश इझलकर यांची मदत घेत, 'पेनलेस इंजेक्शन'ची निर्मिती केली. विशेष म्हणजे त्यासाठी पेटंटही फाईल करण्यात आले आहे. 

'गेट' थेअरीवर आधारित -
'पेनलेस इंजेक्शन'ची संकल्पना ही 'गेट' थेअरीवर आधारित आहे. त्वचेवर अतिथंड पदार्थ ठेवून त्याला व्हायब्रेट केल्यास मस्तिष्काला त्याची संवेदना कळत नाही. या 'गेट थेअरी'चा उपयोग करीत या उपकरणात 'कुलंट' भरण्यात आले आहे. याशिवाय एक छोटीशी मोटर बसविण्यात आली आहे. शिवाय त्यात इंजेक्शन दिसून येत नसल्याने ते बघण्याची भिती नसल्याने टोचताना कुठलाही त्रास होत नाही. 

चिमुकल्यांना इंजेक्शनची भीती वाटत असल्याने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन वरदान ठरणारे आहे. त्यामुळे दातावर उपचार करताना याचा चांगला उपयोग होत असून त्याच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. शिवाय त्यासाठी पेटंटही मिळाले आहे. 
-डॉ. रश्मी उद्दनवाडीकर, असोसिएट प्रोफेसर, यांत्रिकी (मेकॅनिकल) विभाग, व्हीएनआयटी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com